सापाड : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज प्रशासनाविरोधात जनतेचा तीव्र आक्रोश उसळला. मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली “मटका फोड आंदोलन” करण्यात आले. “पाणीपुरवठा ही मूलभूत गरज आहे. भगवाननगर आणि एव्हरेस्ट नगरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नका. समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र होईल.”
भगनी नगर आणि एव्हरेस्ट नगर परिसरातील प्रभाग क्र. 23 आणि 27 मधील शेकडो महिला हातात माठ घेऊन महापालिका मुख्यालयासमोर जमल्या. “पाणी द्या! पाणी द्या!”, “दूषित पाणी नको, स्वच्छ पाणी हवे!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्थानिक महिलांनी संतापाच्या भरात महापालिका गेटसमोर माठ फोडत आपला रोष व्यक्त केला. कमी दाबाने पाणी येणे, दिवसातून फक्त काही मिनिटेच पुरवठा होणे, तसेच नळातून दुर्गंधीयुक्त आणि चिखलकट पाणी येणे या गंभीर समस्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या, परंतु संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
“घरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, लहान मुलांना आणि वृद्धांना आजारपणाचा धोका वाढला आहे. तरीही प्रशासन मौन बाळगून बसले आहे,” असा संतप्त सूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. महिलांनी यावेळी महापालिकेला थेट इशारा दिला की “आम्हाला पाणी नाही, तर तुम्हाला मत नाही!” महापालिका मुख्यालयासमोर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. नागरिकांच्या या तीव्र आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाला आता तरी जाग येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील काळात महापालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन
पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. एक वर्षापासून भगवाननगर आणि एव्हरेस्ट नगरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले, पण काहीच हालचाल दिसत नाही. जर ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर आम्ही पुढील काळात महापालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. प्रशासनाने त्वरित पुरवठा सुधारला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी पुढारीशी बोलतांना सांगितले.