ठाणे

Kalyan Dombivli Flood Alert : धोक्याची घंटा! कल्याण-डोंबिवलीवर पुराचे संकट, उल्हास नदीची पाणी पातळी 'अलर्ट'च्या उंबरठ्यावर

Ulhas River Water Level : नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन, एनडीआरएफसह बचाव पथके तैनात

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी १५.५० मीटरवर नोंदवली गेली. या नदीची इशारा पातळी १६.५० मीटर आणि धोक्याची पातळी १७.५० मीटर असल्याने, नदी सध्या इशारा पातळीपासून केवळ एक मीटर खाली आहे. नदीची पातळी तासागणिक वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नदीची पातळी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीत २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या मान्सून मोसमात आतापर्यंत एकूण ४५७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

'या' भागांना सर्वाधिक धोका

उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने लगतचा परिसर आणि नदीकाठच्या झोपडपट्टी भागातील रहिवाशांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीही याच भागांमध्ये पूर येऊन पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या भागातील रहिवाशांना विशेष काळजी घेण्याच्या आणि सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या उपाययोजना अन् आयुक्तांचे आवाहन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथके तैनात केली आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटी, लाईफ जॅकेट, टॉर्च आणि इतर आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या शाळा आणि सामुदायिक सभागृहांमध्ये तात्पुरत्या निवारा केंद्रांचीही तयारी करण्यात आली आहे. "रहिवाशांनी नदीकाठी जाऊ नये, तसेच फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी नदी अथवा पुलावर गर्दी करू नये; प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे," असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.

भयभीत रहिवासी स्थलांतरासाठी सज्ज

नदीची पातळी वाढल्याने नदीकाठच्या रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. "नदीला पूर येतो की काय, या भीतीने आम्हाला रात्री झोप येत नाही. गेल्या वर्षी आमच्या घरात पाणी शिरले होते, यंदा प्रशासनाने आधीच ठोस खबरदारी घ्यावी," अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तर, "पाऊस थांबत नसल्याने आम्ही आधीच घरचे सामान आवरून ठेवले आहे, गरज पडल्यास आम्ही तातडीने स्थलांतर करू," असेही काही नागरिकांनी सांगितले.

सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असली, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. रहिवाशांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी १०८ किंवा महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT