MSEDCL Raid Power Theft Worth 62 Lakhs
डोंबिवली : वेगवेगळ्या गैरमार्गांनी वीज वापर करणाऱ्या कल्याण पूर्व परिसरातील वीज चोरांवर महावितरणने मोठी कारवाई केली असून आतापर्यंत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवायांत ६२ लाखांची वीज चोरी उघड करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या महिन्यात कल्याण मलंगगड रोडला असलेल्या नेवाळी, पिसवली आणि डोंबिवली जवळच्या खंबाळपाडा या भागात गैरमार्गाने वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत एकूण २६१ वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून वीज चोरट्यांनी तब्बल २ लाख ८३ हजार युनिट वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. या चोरीचे मूल्यांकन ६१ लाख ९४ हजार रुपये इतके आहे.
विहित मुदतीत तडजोड शुल्क न भरल्यामुळे महावितरणकडून वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नेवाळी येथील समीर जाधव, किशोर जाधव, खंबाळपाडा गावातील विकास पवार, पुनम चोरगे, निशांत ढांके, पिसवली गावातील भारत सानप, राम दुबे आणि धामणगाव येथील सुचित्रा सुर्वे या ८ ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगामी काळातही वीज चोरी करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारची कठोर मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून सांगण्यात आले.