डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या वेगवेगळ्या परिसरात कोयताधारी गुंडांचा राबता वाढला आहे. रात्रीच्या सुमारास परिसरात दहशत माजविणे, हातात कोयते, तलवारी घेऊन किरकोळ कारणावरून पादचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा कोयताधारी टोळीतील गुंडांचा शोध सुरू असताना डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी खंबाळपाड्यातील भोईरवाडी परिसरात असलेल्या कृष्णा व्हिला सोसायटी जवळच्या एका शेडवर पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कोयता, तलवारी, छऱ्याच्या बंदुकीचा साठा जप्त करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.
खंबाळपाडा भोईरवाडीत एका शेडमधून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्याचे हवालदार बाबुराव हांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार रवी मोहन शिंदे (२७, रा. विशाल चाळ, गुप्ता किराणा दुकानामागे, खंबाळपाडा), अन्झार अब्दुल कयुम शेख (२५, रा. अन्सारी चाळ, भोईरवाडी, खंबाळपाडा), आकाश अशोक शेलार, अतिश उर्फ मोन्टी अशोक शेलार या चार बदमाशांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियमसह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रवी आणि अन्झार यांना शस्त्रसाठ्यासह रंगेहातअटक करण्यात आली आहे.
टिळकनगर पोलिसांचे पथक रात्रीच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गस्ती पथकाला खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार खंबाळपाडा परिसरातील कृष्णा व्हिला सोसायटीच्या परिसरात असलेल्या एका शेडमध्ये काही बदमाश कोयते, तलवारी, बंदुका असा शस्त्रसाठ्यासह बसले असल्याची खबर मिळाली होती. त्यामधील काही जण हातात कोयते आणि तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरवित आहेत. गुंडांकडून धोका होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, उपनिरीक्षक रमेश चौघुले, हवालदार बाबुराव हांडे, रावसाहेब काटकर, परशुराम वैद्य, बीट मार्शल घायवट यांनी तात्काळ आवश्यक संरक्षणाची सामुग्री घेऊन खंबाळपाड्यातील भोईरवाडीकडे धाव घेतली.
छतावरून उड्या मारून दोघे पसार
चार बदमाश एका शेडमध्ये हातात शस्त्रे घेऊन बसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांचे पथक शेडमध्ये घुसताच चारही जण शस्त्रसाठा सोडून पळून जाऊ लागले. दोघे जण शेडमध्ये लावलेल्या लाकडी शिडीवर चढून अंधाराचा फायदा घेत छतावरून उड्या मारून पळून गेले. हवालदार बाबुराव हांडे आणि परशुराम वैद्य यांनी पाठलाग करून दोघा गुंडांच्या मुसक्या आवळल्या. रवी शिंदे आणि अन्झार शेख अशी आपली नावे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे शेडमध्ये असलेल्या सशस्त्र गुंडांकडून अन्य कुणाला तरी शिवेगाळ करत जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
गुंडांच्या नांग्या ठेचण्याचे आव्हान
आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंड-गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. दोन दिवसांपूर्वी कोयताधारी टोळीतील सात बदमाशांनी मिळून पश्चिम डोंंबिवलीतील मोठागावमध्ये दहशत निर्माण केली होती. या टोळक्याने रात्रीच्या सुमारास एका निष्पाप तरूणावर जीवघेणा हल्ला करून त्याला आणि त्याच्या साथीदाराला गंभीर जखमी केले. कल्याण-मलंगगड रोडला मध्यरात्रीच्या सुमारास एका गुंडाने हातात कोयता घेऊन वाहन चालकांंना धमकावले होते. त्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. शहरात नशामुक्त अभियान यशस्वी होत असताना आता कोयताधारी टोळक्यांनी तोंड वर काढल्याने या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.