ठाणे

Kalyan-Dombivli News : बारवी धरण ७६.४० टक्के भरले; ओव्हरफ्लोसाठी अवघे २.९० मीटर बाकी

Barvi Dam Water Storage : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खूशखबर

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्याने आता वेग घेतला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७६.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आता अवघे २.९० मीटर अंतर शिल्लक राहिले आहे.

धरण प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी धरणाची पाणीपातळी ६९.७० मीटर इतकी नोंदवली गेली. धरणाची कमाल पातळी ७२.६० मीटर आहे. सध्या धरणात २५८.८९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५७.४० मिमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील एकूण सरासरी पाऊस १८३५.६० मिमी इतका झाला आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहण्याचे दिवस आता फार दूर नाहीत, अशी चर्चा या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

तुलना करायची झाल्यास, गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २७ जुलै २०२५ रोजी धरण ८७.७९ टक्के भरले होते. त्यावेळी पाणीपातळी ७१.२३ मीटर आणि उपयुक्त साठा २९७.४६ दशलक्ष घनमीटर होता. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत १८८४.०० मिमी पाऊस झाला होता.

दरम्यान, सध्या पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढील काही दिवसांत धरण ओव्हरफ्लो होऊ शकते. तरीही नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोमवारची आकडेवारी एका नजरेत

  • पाण्याची पातळी : ६९.७० मीटर

  • ओव्हरफ्लो पातळी : ७२.६० मीटर

  • उपयुक्त साठा : २५८.८९ द.घ.मी.

  • पाणीसाठा : ७६.४० टक्के

  • २४ तासांतील पाऊस : ५७.४० मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT