डोंबिवली : मराठी शिकण्यासाठी परिवहन विभागाने तब्बल सात महिन्यांचा अवधी देऊनही कल्याण-डोंबिवलीतील अनेक अमराठी रिक्षावाल्यांनी प्रवाशांशी दोन शब्द बोलता येईल इतकीही मराठी शिकली नाही. अखेर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडुका उगारला असून मराठी न बोलणाऱ्या ११ अमराठी रिक्षाचालकांना ऑन द स्पॉट नोटिसा बजावल्या आहेत. कल्याणपासून या कारवाईला सुरुवात होताच अनेक अमराठी रिक्षावाल्यांनी कल्याण-डोंबिवलीतून पळ काढल्याचे चित्र दिसून येत आहे.
मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली १५ ऑगस्टची मुदत संपताच परिवहन विभागाच्या आदेशावरून कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने कल्याण-डोंबिवलीतील अमराठी रिक्षावाल्यांची अचानक तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात २०० रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ अमराठी रिक्षाचालकांना साधे व्यवहारापुरतेही मराठी बोलता येत नसल्याचे उघड झाले. भरारी पथकाने या चालकांना नोटिसा देऊन तातडीने मराठी शिकण्याची तंबी दिली आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा तर मराठी आलीच पाहिजे, या भूमिकेवर सरकार ठाम आहे. यासाठी प्रत्येक अमराठी रिक्षाचालकाने प्रवाशांशी संवाद साधता येईल इतकी तरी मराठी शिकावी, असे स्पष्ट आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सात महिन्यांपूर्वी घेतलेल्या या निर्णयावरून काही मंडळींनी मराठी-अमराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा तर मराठी शिकावीच लागेल, यावर सरकारचे एकमत झाले आणि राज्यभरात मराठी सक्तीचे करण्यात आले.
या निर्णयानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा संघटनांच्या मदतीने अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते. या वर्गात तब्बल ४५०० अमराठी रिक्षाचालकांनी सहभाग घेऊन जुजबी मराठीचे ज्ञान घेतले आणि त्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली. तरीही अनेक चालकांनी या वर्गाकडे पाठ फिरवली, मराठी शिकण्याची साधी तसदीही घेतली नाही. त्यामुळेच १५ ऑगस्टनंतर मराठी न बोलणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले होते.
२०० पैकी ११ रिक्षावाले अनुत्तीर्ण
कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षकांच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील अमराठी रिक्षाचालकांची तपासणी या पथकाकडून केली जात आहे. गुरूवारी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्या जवळील भवानी चौकातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या २०० चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ चालकांना मराठीचे पुरेसेही ज्ञान नसल्याचे आढळून आले. या चालकांना आरटीओने ऑन द स्पॉट नोटीसा दिल्या.
कारवाई टाळण्यासाठी मराठी शिका
कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात व्यवहारापुरतीही मराठी न येणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी ११ जणांना नोटिसा दिल्या असून ही कारवाई आता रोज नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे कारवाईचा बडगा टाळायचा असेल तर अमराठी रिक्षाचालकांनी तातडीने मराठीचे ज्ञान अवगत करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.