Kalyan Dombivli accident : आंबिवलीत तिसऱ्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय मजुराचा मृत्यू! कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli accident : आंबिवलीत तिसऱ्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय मजुराचा मृत्यू! कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद

बांधकाम साईटवर सुरक्षा साधनांचा अभाव, खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरूबांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना न केल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण जवळच्या आंबिवली येथे घडली आहे. या प्रकरणी कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अब्दुल कलीम आजीम साह (२४) असे मृत कामगाराचे नाव आहे.

   या प्रकरणी मे. निजाम एन्टरप्रायजेसचे कंत्राटदार नौसाद निजामउद्दीन मन्सुरी (२४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अब्दुल कलीम हा आंबिवली येथील मंगेशी स्टार २ या कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरीचे काम करत होता. रविवारी २२ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना तेथून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. कंत्राटदाराने त्याला तात्काळ कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पुणे येथे राहणारा त्याचा लहान भाऊ अब्दुलमोकीम साह (१९) याने कल्याण गाठले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अब्दुल कलीमला पुढील उपचारासाठी कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र दोन दिवसांनी मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

आठवडाभराच्या तपासाअंती कंत्राटदार बेजबाबदार

या घटनेनंतर पोलिसांनी आठवडाभर तपास केला असता कंत्राटदार बेजबाबदार असल्याचे सिद्ध झाले. मयत अब्दुल कलीमचा भाऊ अब्दुलमोकीम साह यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तशी फिर्याद दाखल केली. कंत्राटदार नौसाद मन्सुरी याने बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत कोणतीही सुरक्षा साधने किंवा उपाययोजना न करता निष्काळजीपणा दाखवल्याने आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आंबिवली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बांधकाम साईटवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT