डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात याही वर्षी दहीहंडी उत्सवाचा उत्साह वाढणार आहे. शनिवारी दिवसभरात कल्याण-डोंबिवलीच्या शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी खासगी 275, तर 50 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 325 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांकडून फोडल्या जाणार आहेत. लाख मोलाच्या या हंड्या फोडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सातत्याने सराव करणारी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. सार्वजनिक दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदांचा जोश वाढवण्यासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.
शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून दहीहंड्यांच्या कार्यक्रमाला प्रारंभ होऊन रात्री 10 पर्यंत सगळ्या हंड्या फोडण्यात येणार आहेत. डोंबिवलीत नवसाई, आयरेगावचा राजा, नवयुग, आत्मविश्वास, बाळकृष्ण, माऊली तर कल्याणमध्ये युवा कब्बडी, अकादमी गोविंदा, आदी पथके हंड्या फोडण्यास सज्ज झाली आहेत. सामाजिक संदेश देणार्याही हंड्या देखिल यंदा लक्षवेधी ठरणार आहेत. डोंबिवलीत मनसेच्यावतीने चार रस्ता येथे हंडी लावण्यात येते. मानपाडा रोडला चार रस्त्यावर दहीहंडी उत्सवात बाळकृष्ण बनून या आणि बक्षीस घेऊन जा, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष राहूल कामत यांनी केले आहे.
यावेळी लकी ड्रॉमध्ये एअरकंडिशन मशीन, सायकल, मनगटी घड्याळ, ड्रेसिंग टेबल, मोबाईल, फ्रिज आदी गृहपयोगी वस्तूंसह महिलांसाठी पैठणी लेडीज ड्रेस चा समावेश राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी आमदार तथा मनसेचे नेते मनसेचे नेते राजू पाटील हे या उत्सवाला हजेरी लावणार आहेत. डोंबिवलीत एकमेव अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव महिला गोविंदा पथकाने ठिकठीकाणी दहीहंड्यांना सलामी देऊन हंड्याही फोडणार आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही महिला गोविंदा पथकांसाठी नवरे कंपाऊंड तर दीनदयाळ रोडला पुरूष पथकांसाठी दहीहंडी उभारण्यात येणार असल्याची महिती माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली.
पश्चिमेकडील महात्मा फुले रोडला मथुरा साई दिलासा मंडळाची मथुरा दहीहंडी लावण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही डोंबिवली पूर्वेतल्या बाजीप्रभू चौकातील भाजपाची लाख मोलाची दहीहंडी लक्षवेधी ठरणार आहे. डोंबिवलीच्या आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य स्टेज उभारणी करण्यात येत आहे. तर शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे शहरप्रमुख तथा आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वेकडील शिवमंदिर रोडला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कल्याणला महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक 4, तर खासगी 40 दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक 9, तर खासगी 20 ठिकाणी दहीहंड्या लावण्यात येणार आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी 5, तर 15 ठिकाणी खासगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 ठिकाणी सार्वजनिक, तर 13 ठिकाणी खासगी दहीहंड्या लावण्यात येणार आहेत. डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 ठिकाणी सार्वजनिक, तर 35 ठिकाणी खासगी दहीहंड्यांचा कार्यक्रम होणार आहे. विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 सार्वजनिक, तर 50 खाजगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.
43 ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव
शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याकरिता शुक्रवारी सायंकाळपासून विविध मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी श्रीकृष्ण जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणला महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत 3, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 7, खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 7, डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2, विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 आणि टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4, अशा एकूण 43 ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडून कायदा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याण परिमंडळ 3 पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या नेतृत्वाखाली 22 निरीक्षक, 71 सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, 476 पुरूष कर्मचारी आणि 126 महिला कर्मचार्यांसह राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.