डोंबिवली: कल्याण-डोंबिवली परिसरातील तब्बल ५००० लोकांना एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्यात फसवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार या घोटाळ्याची एकूण रक्कम सुमारे १००० कोटी रूपयांपर्यंत असू शकते.
यापैकी जवळपास ३००० गुंतवणूकदारांनी धनादेशाद्वारे पैसे भरले असून जवळपास २००० जणांनी रोख स्वरूपात गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील १०० हून अधिक गुंतवणूकदारांनी ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या आहेत.
आधीची गुंतवणूक परत मिळेल आणि जास्त परतावा मिळेल या आमिषाने वारंवार अतिरिक्त पैसे भरण्यास सांगितल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. या कथित फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून अनेक तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आहेत.
त्यांनी घरे गहाण ठेवली, कर्ज घेतले किंवा सेवानिवृत्तीनंतरची संपूर्ण बचत या योजनांमध्ये गुंतवली आहे. ७७ वर्षीय एका गुंतवणूकदारावर तर स्वतःचे घर गमावण्याची वेळ आली असून त्याने आपली आयुष्यभराची कमाई या योजनेत गुंतवल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण गुंतवणूक नेटवर्कमध्ये प्रशांत आंगणे आणि कॉनकनस्मार्ट तसेच प्रोगेन रेंटल सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. गुंतवणूकदार रसिका सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, हा प्रकार कॉनकनस्मार्टपासून दोन वर्षांपूर्वी सुरू झाला.
जिथे अडकलेली गुंतवणूक परत मिळेल या आश्वासनावर गुंतवणूकदारांना अतिरिक्त १० टक्के, ३० टक्के किंवा ५० टक्के रक्कम भरण्यास सांगण्यात आले. प्रशांत आंगणे यांना आधीच्या एका आर्थिक गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा प्रोगेन रेंटल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अतिरिक्त पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले.
तक्रारीनुसार, यानंतर गुंतवणूकदारांना आधीच्या अडकलेल्या रकमेवर आणखी १५ टक्के रक्कम भरण्यास सांगण्यात आले. काही महिने काही प्रमाणात परतावा दिल्यानंतर पुन्हा पैसे देणे बंद करण्यात आले. ऑगस्ट २०२५ पासून ५ टक्के परताव्याचे अमिष दाखवून नव्याने गुंतवणूक गोळा करण्यात आली. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता तीही बंद करण्यात आली. त्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे तीन महिने होल्डवर ठेवल्यास ७.५ टक्के परतावा देऊ असे सांगण्यात आले.
गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मिळेल या आशेने वारंवार पैसे भरूनही आयुष्यभराची बचत डोळ्यादेखत नाहीशी होत असल्याची व्यथा गुंतवणूकदारांनी मांडली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आम्ही पुन्हा पुन्हा पैसे भरत आहोत. प्रत्येक वेळी नवी योजना, नवी मुदत आणि नवे आश्वासन दिले जाते. पण पैसे देणे बंद झाले की आमच्यासमोर एकच प्रश्न उरतो, आमचे पैसे गेले कुठे ? अशी व्यथा एका गुंतवणूकदाराने मांडली आहे.
ज्येष्ठ नागरिक मीना आगाशे यांनी सांगितले की, त्यांची दुसरी बहीण ऑस्टिओपोरोसिससह अनेक आजारांनी त्रस्त असून तिच्या उपचारासाठी औषधांवर मोठा खर्च होत आहे. असे असतानाही तिने या फर्ममध्ये आयुष्यभराची बचत गुंतवली आहे.
आजपर्यंत एक रूपयाचाही परतावा मिळाला नाही. सध्या तिची आर्थिक आणि आरोग्याची स्थिती अत्यंत बिकट असून मूळ गुंतवणूकही परत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नत्याग आंदोलनाचे उपसणार खड्ग
हजारो गुंतवणूकदारांकडून नेमकी किती रक्कम गोळा करण्यात आली? ही रक्कम कुठे वापरण्यात आली? आणि थकित रक्कम परत करण्याची नेमकी काय व्यवस्था आहे? याची चौकशी करण्याची मागणी एक गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक मीना आगाशे यांनी केली आहे. कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निष्पक्ष तपास, गुंतवणूक केलेल्या पैशांची वसुली आणि कथित धमक्या किंवा दबावापासून संरक्षणाची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. वारंवार प्रयत्न करूनही उत्तरे मिळत नाहीत. गुंतवणूक केलेल्या रकमा परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी शांततामय आंदोलन आणि अन्नत्यागाचा इशाराही दिला आहे. दरम्यान २०२१ पासून गुंतवणूकदारांना फसवले जात असून वारंवार त्याच पद्धतीने गुन्हा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अखेर पोलिसांनी तक्रारी स्वीकारल्या
सुरूवातीला पोलिस अधिकारी तक्रारदारांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी तक्रारी स्वीकारून चौकशी सुरू केली असून तपासासाठी गुंतवणूकदारांकडून अधिक माहिती आणि कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. या प्रकरणी परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, तक्रारींची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.
नारीशक्ती ग्रुप डिलीट करण्यासाठी दबाव
रसिका सावंत यांनी या गुंतवणूक वजा फसवणूककांडात अडकलेल्या महिला गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी नारीशक्ती नावाचा टेलिग्राम ग्रुप तयार केला. मात्र हा ग्रुप डिलीट करण्यासाठी दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशांत आंगणे यांनी एका व्हिडिओमध्ये आपल्या ओळखी वरपर्यंत असून आपण काय करू शकतो याबाबत वक्तव्य केल्याचा उल्लेखही रसिका यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.