ठाणे

Thakurli Flyover : १३ वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, ८२ बाधितांचे स्थलांतरण सुरू; कामाला वेग येणार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या तसेच गेल्या तेरा वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. पुलाच्या मार्गात येणाऱ्या ८२ बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून सोमवारपासून त्यांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. रहिवाशांनी घरे रिकामी करताच बांधकामे हटवण्याची कारवाई हाती घेण्यात येणार असल्याने, उड्डाणपुलाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौक ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, जागेची अडचण आणि पुनर्वसनाचा तिढा यामुळे गेल्या तेरा वर्षांपासून हे काम रखडले होते. या मार्गावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाच्या उर्वरित कामासाठी राज्य शासनाकडून ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधी उपलब्ध झाला तरी ८२ बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम असल्याने कामाला गती मिळत नव्हती. अखेर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नगरसेविका शारदा चौधरी, खुशबू चौधरी आणि माजी उपमहापौर राहुल दामले यांच्या पुढाकाराने बाधित रहिवाशांसोबत बैठकांचे सत्र पार पडले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, 'फ' प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, बाधितांपैकी काही रहिवाशांना बारावे येथील बीएसयूपी (BSUP) प्रकल्पात, तर काहींना खंबाळपाडा येथील बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात आली आहेत. तसेच जागामालकांना टीडीआरच्या (TDR) माध्यमातून मोबदला देण्याबाबत करार करण्यात आला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याने रहिवाशांनी स्वेच्छेने घरे रिकामी करण्यास सहमती दर्शवली आहे.

सध्या या ८२ बाधित कुटुंबांचे स्थलांतर सुरू असून, घरे पूर्णपणे रिकामी होताच उड्डाणपूल आणि रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अडथळे हटवण्याचे काम महापालिकेकडून केले जाईल. जागा मोकळी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला वेग येईल. हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर म्हसोबा चौक ते ठाकुर्ली स्थानकादरम्यानच्या तीव्र वाहतूक कोंडीतून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT