Digital Arrest Pudhari
ठाणे

Kalyan Digital Arrest : दहशतवाद्यांना हत्यारे पुरवल्याचा आरोप करुन वृद्धाला घाबरवले, डिजीटल अरेस्टची धमकी देऊन ६.५० लाख उकळले

कल्याणमधील प्रकार : एमएफसी पोलिसांकडून तपास चक्रांना वेग 

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : तुम्ही बेनामी गैरव्यवहार केले आहेत, तुम्ही दहशतवाद्यांना हत्यारे पुरवली आहेत, तुमचे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत, असा आरोप करून ऑनलाईन भामट्यांनी कल्याणमधील एका ६९ वर्षीय वृद्धाला तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. डिजीटल अरेस्टचा हा धक्कादायक प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने या वृद्धाने अखेर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून भामट्यांचा शोध सुरू केला आहे.

     दत्तात्रय बोपर्डीकर असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव असून ते कल्याण पश्चिमेकडे असलेल्या चिकणघर भागातील होली क्रॉस शाळा परिसरात राहतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी विदेशात नोकरी करतात. दत्तात्रय हे एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून मुले त्यांना आर्थिक साह्य करतात. दत्तात्रय बोपर्डीकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलिस आयुक्त असल्याची थाप मारणाऱ्या मनोज कुमार शर्मा याच्यासह अन्य एका भामट्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    तक्रारदार दत्तात्रय बोपर्डीकर यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार वीस दिवसांपूर्वी त्यांना मोबाईलवरील व्हॉट्स ॲपवर कॉल आला. समोरच्या इसमाने तुमच्या विरूद्ध जम्मू/काश्मीर पोलिस ठाण्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगितले. आपणास तात्काळ दहशतवाद विरोधी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले. आपण कल्याणला राहतो, तात्काळ जाणे शक्य नाही असे दत्तात्रय बोपर्डीकर यांनी त्यांना सांगितले, एका वरिष्ठाने आपण येणार नसाल तर आम्ही तुम्हाला अटक करू, अशी धमकी दिली.

समोरच्याने काही कागदपत्रे मोबाईलवर पाठवली. त्यानंतर आपणास तोतया पोलिस आयुक्त मनोज कुमार शर्मा या इसमाबरोबर बोलण्यास सांगितले. स्वतःला पोलिस आयुक्त असल्याचे सांगणाऱ्या इसमाने तक्रारदार दत्तात्रय बोपर्डीकर यांना घाबरवून सोडले. तुम्ही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकला आहात, तुमचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत, तुम्ही दहशतवाद्यांना हत्यारे पुरवली आहेत, अशा आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या त्या इसमाने तुमचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तुमच्या सर्व बँक खात्यांचा तपशील कळवा, तो आम्हाला आरबीआयकडे तपासणीसाठी पाठवायचा आहे असे सांगून इसमाने आपण ही माहिती कुणाला सांगायची नाही, गुप्तता बाळगायची, अशा सूचना दिल्या.

त्या इसमांनी आपणास आरबीआयची काही बनावट कागदपत्रे पाठवली, तसेच ६ लाख ५० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. घाबरलो असल्याने ती रक्कम तात्काळ पाठवली. चौकशी केल्यावर आपली भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपण पोलिस ठाण्यात त्या दोन अज्ञात इसमांविरूद्ध तक्रार करत असल्याचे दत्तात्रय बोपर्डीकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

    या घटनेने पुन्हा एकदा एक गोष्ट समोर आली आहे की पोलिस, सीबीआय, ईडी किंवा आरबीआय कधीही व्हॉट्स ॲप कॉलवरून डिजिटल अरेस्ट करत नाही आणि पैसे मागत नाहीत. कॉल आला तर घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT