ठाणे

Thane news | कल्याणच्या डीसीपी पथकाची वडवलीत लक्षवेधी कारवाई

एमडीच्या साठ्यासह सराईत ईराणी बदमाश चतुर्भुज; ६.२५ ग्रॅम एमडीसह १.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष कारवाई पथकाने खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून एमडीसह एका सराईत बदमाशाला अटक केली आहे. शहाड-आंबिवली मार्गावरील वडवली गावाजवळ केलेल्या या लक्षवेधी कारवाईत पथकाने एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून ६.२५ ग्रॅम एमडीसह १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष कारवाई पथकातील सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांच्यासह सदानंद देवरे, अमित शिंदे, पोशि. अनिल खरसान, आकाश विरण, चेतन पाटील, प्रविण खांडेकर हे पथक खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या पेडलर व फरार आरोपींचा शोध घेत गस्त घालत होते.

यावेळी पथकाला वडवली परिसरातून जाणाऱ्या रोडवर मोंगरी बिल्डिंगच्या समोर एक जण एम एच ०५/ ई झेड /६६८४ क्रमांकाच्या स्कूटीजवळ संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याची जागीच गठडी वळली. झडती घेतली असता त्याच्याकडे ६.२५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रूपये आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अब्बास हैदर सय्यद ईराणी (२६) असून तो कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या इराणी काबिल्यात राहणारा आहे. या बदमाशाला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अब्बास ईराणीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १५४, ४५२, ३२३, ३२४, ३४, १४३, १४, १४७, १४८, ५०४, ५०६ सह मुंबई पोलिस कायद्याचे कलम ३७ (१) (३), १३५, महाराष्ट्र अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT