सापाड : कल्याण शहर हादरवून टाकणारी एक भीषण घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. कल्याण एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून या तरुणाची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नाल्यातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून, तो शवविच्छेदनासाठी कल्याणच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांनी घटनास्थळ सील करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी नियंत्रण ठेवले.
मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र न सापडल्याने ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सध्या पोलिसांकडून परिसरातील फुटेज तपासले जात असून, रात्री उशिरा मार्केट परिसरात कोणती हालचाल झाली याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या मते, ही घटना रात्री उशिरा 11 ते 2 दरम्यान घडली असावी.
मार्केट परिसरात अंधार असल्याने आरोपींनी या ठिकाणी खून करून मृतदेह नाल्यात फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे तपास पथक या घटनेचा हत्या, ओळख व गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी विविध दिशांनी तपास करत आहे.
परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि सुरक्षारक्षकांकडून चौकशी सुरू असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम देखील घटनास्थळी बोलावण्यात आली आहे. कल्याणमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या हत्येचा तपास जलदगतीने सुरू आहे.
“एपीएमसी परिसरात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, हा खून असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काही संशयितांच्या हालचालींची माहिती मिळाली आहे. लवकरच सदरचे प्रकरण उघडकीस येईल,”पोलीस अधिकारी, बाजारपेठ पोलीस ठाणे