डोंबिवली : कल्याण येथील एका लॉजच्या रूमध्ये बहीण-भावाने हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने या भावंडांचे प्राण वाचले आहेत. सध्या ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनसमोरील एका लॉजमध्ये गुरुवारी (दि. २३) सकाळी तेथील कर्मचारी रूमध्ये गेला असता, तेथे थांबलेले महिला व पुरुष रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. दोघांच्याही मनगटातून रक्तस्त्राव होत होता. कर्मचाऱ्याने तात्काळ याची माहिती व्यवस्थापकाला दिली आणि व्यवस्थापकाने महात्मा फुले चौक पोलिसांना कळवले.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराम सिंग परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ लॉजवर दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले.
महात्मा फुले चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील बेलसेकर (वय ५६) आणि पद्मजा बेलसेकर (वय ५३) अशी या बहीण-भावाची नावे असून ते दोघे आसनगाव येथील रहिवासी आहेत. दोघेही मंगळवारी, २१ जुलै रोजी कल्याणच्या या लॉजमध्ये राहण्यासाठी आले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघांकडेही कोणतेही काम नव्हते. सततची बेरोजगारी, गरिबी आणि उपासमारीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या भावंडांनी खरोखरच नैराश्यातून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला की यामागे आणखी काही कारण आहे, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.