ठाणे

Kalyn Crime | घरात झोपलेल्यांवर चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारले, ७ लाखांचा ऐवज लंपास : कल्याणच्या पिसवली गावात विचित्र प्रकार

मानपाडा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू, मोबाईल, लॅपटॉप् चोरीला

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या कल्याण जवळच्या पिसवली गावातून धक्कादायक प्रकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे. घरातील सदस्यांवर गुंगीचे औषध फवारून चोरट्यांनी रोख, दागिने आणि मोबाईलसह ७ लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे २ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

    पिसवली रोडला असलेल्या सिद्धार्थनगरात राहणारे नितीन शांताराम गायकवाड (४२) पत्नी अर्चना, मुलगा आदित्य, अथर्व, वडील शांताराम आणि भाऊ सतीश यांच्यासह राहतात. नितीन गायकवाड हे एका कंपनीत मॅनेजर पदावर नोकरी करतात. तसेच जोडधंदा म्हणून डोंबिवली परिसरातील विविध मनीट्रान्सफर डिपाझिट करतात. त्यांचा ए. जी. ट्रान्सपोर्टचा व्यवसास आहे. त्यातून दुकानांतील रकमांचे कलेक्शन करून जमा झालेली रक्कम स्वतःकडे ठेवून दुसऱ्या दिवशी बँकेत जमा केले जातात. यावर गायकवाड कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

    या संदर्भात नितीन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गायकवाड कुटुंबीय सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. मंगळवारी पहाटे २ ते ६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून गुंगीचे औषध सोडले असावे. त्यामुळे घरातील सर्वांना गाढ झोप लागली. सकाळी ६ वाजता जाग आल्यावर पाहिले असता घरातील कपाट आणि लॉकर फोडले होते. तपासणी केली असता घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि आठ मोबाईल फोन चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

    फिर्यादी नितीन गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार चोरट्यांनी एकूण ७ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यात ६ लाख ५० हजार रोख रक्कमेचा समावेश आहे. तसेच ७५ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३७ हजार रूपये किंमतीचे ८ मोबाईल फोन चोरीला गेले. त्यात व्हिवो, वनप्लस, सॅमसंग, ओप्पो, रिअलमी यासारख्या कंपनीचे मोबाईल आहेत. पोलिसांनी सर्व मोबाईलचे आयएमईआय क्रमांक नोंदवले आहेत. याशिवाय लॅपटॉप, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे चेकबुक आणि महत्त्वाचे कागदपत्रेही चोरीला गेली आहेत.

     या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच चोरीला गेलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबर सर्व्हेलन्सवर टाकण्यात आले आहेत. मानपाडा पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT