डोंबिवली : लेक वाचवाच्या घोषणा देणाऱ्या शहरातच माणुसकीला लाजवणारी घटना घडली. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेकडे असलेल्या चिकणीपाड्यातील श्री विठ्ठल मंदिराबाहेर असलेल्या एका झाडाखाली पडलेल्या पिशवीत नवजात चिमुरडी आढळून आली.
सावज सापडल्याने पिशवीच्या अवतीभोवती कुत्र्यांच्या झुंडी फिरत होत्या. मात्र इतक्यात परिसरातील पूजा दाभेकर यांनी त्या निरागस चिमुरडीला भटक्या कुत्र्यांच्या झुंडीपासून वाचवले. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या या चिमुरडीच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.
चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा दाभेकर यांना अनेक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. अस्वस्थ झालेल्या पूजा यांनी तात्काळ जाऊन पाहिले असता झाडाखाली एका पिशवी आढळून आली. त्या पिशवी भोवती अनेक भटकी कुत्री फिरत होती. पूजा यांना संशय आल्याने त्यांनी पिशवीत डोकावले असता त्यामध्ये एक नवजात मुलगी आढळून आली. हा प्रकार पाहून त्यांच्या पाया खालची वाळूच सरकली. पूजा यांनी तात्काळ मुलीला पिशवीतून बाहेर काढले आणि घरी नेऊन आंघोळ घातली. त्यानंतर ती मुलगी झोपी गेली. सकाळ झाल्यानंतर पूजा यांनी ही माहिती स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर बालिकेला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले.
जागरूक महिलेमुळे वाचले प्राण
एका निष्पाप जीवाला अशा अवस्थेत सोडून पळ काढणाऱ्या मातेची ममता कुठे हरवली ? असा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना परिसरातील रहिवाशांना अंतर्मुख करून गेली. सार्वजनिक ठिकाणी जर अर्भक सोडले जात असेल, तर आपण माणूस म्हणून कुठे चाललो आहोत ? अशा शब्दांत परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. नवजात मुलीवर सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत सोडलेल्या या बालिकेच्या जीवाला धोका होता. मात्र जागरूक पूजा दाभेकर यांच्या सतर्कतेमुळे या बालिकेचे प्राण वाचले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी असलेल्या विठ्ठल मंदिर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील कॅमेरे तपासून त्या निरागस चिमुरडीच्या जन्मदात्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच परिसरातील रहिवाशांकडूनही माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे अनिच्छेने जन्माला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायद्यानुसार सुरक्षित ठिकाणी अर्भक सोडण्याची शिशू स्वीकृती केंद्रासारखी व्यवस्था असताना अशा प्रकारे बेवारस्थितीत सोडणे हे केवळ बेकायदेशीर नाही तर अमानवीय आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.