डोंबिवली : मुंबईसह ठाणे पोलिस ज्याला जंग जंग पछाडत होते, तो सराईत गुन्हेगार कल्याणातील खडकपाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोठ्या महत्प्रयासाने पोलिसांनी या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अब्बास शाहजोर सय्यद (२५) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून एकूण ६ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे कल्याण, ठाणे आणि मुरबाड येथील एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडजवळील ९० फुटी वडवली रोडवर असलेल्या गांधारी येथून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रेमानाथ ढोले, पोनि मारुती आंधळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे यांच्या पथकाने तपासचक्रांना वेग दिला. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात अखेर या पथकाला यश आले.
खडकपाडा पोलिस ठाण्यात दुचाकीच्या मालकाने फिर्याद दाखल केली होती. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत, या पथकाने ९० फुटी वडवली रोडवरील गांधारी परिसरात गस्तीदरम्यान (पेट्रोलिंग) दुचाकी चोरीत सराईत गुन्हेगार अब्बास सय्यद याचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. अब्बास सय्यद हा कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या मलंगनगर या इराणी वस्तीत राहणारा आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी तत्काळ (ऑन द स्पॉट) हस्तगत करण्यात आली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान त्याच्याकडून विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या ९ दुचाकी असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खडकपाडा पोलिस ठाण्यासह कल्याण, ठाणे शहर आणि मुरबाड येथील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेले एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. शिवाय अब्बास सय्यद हा कापूरबावडी आणि बदलापूर पोलिस ठाण्यातील जबरी चोरीसारख्या मालमत्तेशी संबंधित ३ गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता.