ठाणे

Kalyan Minor Girl Assault : कल्याण पुन्हा हादरले! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला काही तासांतच बेड्या

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, कोळसेवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; ७ दिवसांत दुसरी घटना

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्व भागात एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५५ वर्षीय संशयित आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्याभरातील ही दुसरी दुर्दैवी घटना असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ५५ वर्षीय झुमय अली शेख याने घरात कोणी नसताना या चिमुरडीवर अत्याचार केले. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कुटुंबीयांनी तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांनी पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला धीर देत तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शोध शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी झुमय शेख याला अटक केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पीडित मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिला आवश्यक ते समुपदेशन देखील दिले जात आहे.

नागरिकांमधून कडक कारवाईची मागणी

कल्याण पूर्व परिसरात एकाच आठवड्यात दोन गंभीर घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर कायद्यानुसार कठोर अतिशय कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे.

परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT