डोंबिवली : फरार ड्रग्ज माफिया अमजद पठाण याला अटक झाल्यापासून गेल्या ४० वर्षांपासून परिसरात दहशत माजविणाऱ्या पठाण कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या कुटुंबावर हल्ला केला आहे. पठाण कुटुंबाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पती, पत्नी आणि मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बाजारपेठ पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप केला आहे.
कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्यात आली होती. या घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाईही केली होती. मात्र त्यानंतर या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. नशेच्या कारभाराला विरोध केला म्हणून मुलीची छेड काढण्याचा आरोपी त्यावेळी करण्यात आले होते. परिसरातील नशेखोरांविरोधात वारंवार तक्रारी करणे आणि त्यांच्या बेकायदेशीर कारवायांना विरोध करणे हेच हल्ल्याचे कारण असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अवैध शस्त्रांचा वापर
हल्लेखोरांनी प्रथम मुदस्सर काझी यांच्या पत्नीला मारहाण केली. तिला वाचविण्यासाठी धावलेल्या मुदस्सर आणि त्यांच्या मुलावर हल्ला चढविण्यात आला. धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांना मारहाण करण्यात आली. अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात आवाज उठविल्याच्या रागातून ड्रग्ज माफियांनी तक्रारदार मुदस्सर काझी यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या तिघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वचपा काढण्यासाठी हल्ला
मुदस्सर काझी यांनी कल्याणच्या बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याचाच वचपा काढण्यासाठी ८-१० जणांच्या टोळक्याने काझी यांच्या घरात घुसून लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात काझी यांच्या डोक्याला, पत्नीच्या हाताला, तर १४ वर्षीय मुलाच्या पाठीवर गंभीर वार झाले आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
पठाण कुटुंबाची ४० वर्षांपासून दहशत
या हल्ल्यामागे कुख्यात अमजद पठाण टोळी असल्याचा आरोप आहे. अमजद पठाणचा वडिलोपार्जित ड्रग्जचा व्यवसाय आहे. त्याचे वडील लंबू युसुफ याचा नाशिकमध्ये पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. लंबू युसुफच्या चार मुलांपैकी दोघे आधीच जेलमध्ये आहेत. अमजद पठाण फरार होता, त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बैल बाजार परिसरात या पठाण कुटुंबाची मोठी दहशत आहे. गेल्या ४० वर्षांपासून पठाण कुटुंब ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय करत आहे. गांजा, चरस, ब्राऊन शुगर, एमडी पावडर, सिरपच्या बाटल्या, व्हाइटनर, बटन यासारखे सर्व प्रकारचे अंमली पदार्थ हे कुटुंब विकत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी मदत केली नाही - काझी यांचा आरोप
मी गेल्या 3 महिन्यांपासून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारी देतोय. पण एकदाही कारवाई झाली नाही. उलट आरोपींना माझी माहिती दिली गेली. आज त्यांनीच आम्हाला संपवायचा प्रयत्न केला. पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, असा संतप्त आरोप मुदस्सर काझी यांनी केला.
स्थानिकांमध्ये दहशत आणि पोलिसांचा दावा
या घटनेनंतर कल्याणच्या बाजारपेठ, दुर्गाडी, बैल बाजार, मच्छी मार्केट परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तक्रार केली तर जीवावर बेतते, मग न्याय मागायचा कुणाकडे ? असा सवाल नागरिक करत आहेत. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. आरोपींवर कठोर कारवाई होईलच, पण दुर्लक्ष केल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.