डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील नेतिवली परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती साहित्य लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नदीम लियाकत खान (वय ३१) आणि राम प्रकाश गायकवाड (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नेतिवलीतील भुई डोंगरी परिसरातील आनंदनगर येथे राहणारे आहेत. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेतिवलीतील आनंदनगर परिसरात राहणारे संजय भगवान कांबळे (४५) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर, मोबाईल, पंखा आणि रोख रक्कमेसह इतर साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी २३ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता मधील कलम ३३१ (३), ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नागरिकाचे संपूर्ण घर साफ करून पसार झालेल्या चोरट्यांना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक विजय खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव, विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आढाव, रोहित बुधवंत, सुरेंद्र इंगळे आणि दिलीप कोती यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नदीम खान व राम गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३२ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, ५ हजार रुपयांची रोकड व इतर घरगुती साहित्य असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या या चोरट्यांनी यापूर्वी आणखी कुठे चोऱ्या किंवा घरफोड्या केल्या आहेत का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.