डोंबिवली : कल्याणमध्ये वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांमधून उद्भवलेल्या वादातून दिरानेच आपल्या वहिनीचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने काही दिवसांपासून बोलणे बंद केल्याच्या रागातून दिराने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणातील फरार आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी झारखंडमधून अत्यंत नाट्यमयरीत्या अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या गुड्डू देवी या महिलेला २७ एप्रिल रोजी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना अखेर ११ मे रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार एखादा अपघात असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. तपासादरम्यान मृत गुड्डू देवी आणि तिचा दीर बमबम कुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुड्डू देवी हिने दीर बमबम कुमारशी बोलणे बंद केले होते आणि ती त्याला टाळत होती. याच कारणावरून आरोपी बमबम कुमार कमालीचा चिडला होता. २७ एप्रिल रोजी तो गुड्डू देवीच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादादरम्यान रागाच्या भरात बमबम कुमारने गुड्डू देवीचे डोके जोरात भिंतीवर आपटले. यात ती गंभीर जखमी झाली आणि याच दुखापतीमुळे अखेर तिचा प्राण गेला.
घटनेनंतर आरोपी बमबम कुमारने आपला मोबाईल फोन बंद करून पळ काढल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. पण नातेवाईकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बमबम कुमारच्या झारखंडमधील मूळ गावाचा शोध घेतला. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने झारखंडला रवाना झाले.
पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी बमबम कुमार हा नेपाळच्या सीमेवरून तिथल्या सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, स्थानिक पोलिसांच्या मदतीने खडकपाडा पोलिसांनी नेपाळ सीमे गाठण्यापूर्वीच अवघ्या २० मिनिटांपूर्वी त्याला नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या. आरोपी बमबम कुमार याला कल्याणमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे करत आहेत.