डोंबिवली : भोंदू अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, कल्याणमध्येही एक अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. घरातील बाधा दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७८ वर्षीय भोंदू बाबाला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाहिद शेख असे या अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आईसोबत कल्याण येथे राहते. गेल्या दीड-दोन वर्षांत मुलीच्या वडिलांचा आणि आजीचा लागोपाठ मृत्यू झाल्यामुळे कुटुंब मानसिक धक्क्यात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपी शाहिद शेख याने त्यांच्या घरात 'बाधा' असल्याचे सांगून पीडित मुलीच्या आईची दिशाभूल केली. घराची शांती करण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
पीडितेची आई कामा निमित्त घराबाहेर असताना, नराधम भोंदू बाबाने दोन वेळा घरी जाऊन मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीने हा सर्व धक्कादायक प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रार मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्रे फिरवली आणि ७८ वर्षीय शाहिद शेखला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर पोक्सो कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, आरोपी शाहिद शेख सध्या पोलीस कोठडीत असून त्याने अशा प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.