ठाणे

Kalyan Crime: कामानिमित्त परराज्यातून कल्याणला आलेल्या आईचा रात्री डोळा लागला अन् ६ महिन्याच्या बाळाचे झाले अपहरण

बाळाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ४ पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे रेल्वे स्टेशनबाहेर वोडाफोन गॅलरीसमोरील पुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास एका ६ महिन्यांच्या चिमुरड्याला पळवून नेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरणकर्त्याने अपहृत बाळाच्या आईचा मोबाईलदेखील चोरून नेल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. गुजरातहून कल्याणात काही कामानिमित्त आलेल्या या महिलेच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक (एमएफसी) पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.

ही घटना सोमवारी रात्री ८ ते मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी रोशनी सुरज साहू (२१, रा. सिलवासा, दादरा आणि नगर हवेली) या सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनबाहेरील पुलाखाली आपल्या ६ महिन्यांच्या बाळासह थांबल्या होत्या. रोशनी यांना झोप लागल्याची संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या ताब्यातून बाळाला पळवून नेले आणि जाताना त्यांचा मोबाईलही चोरला.

पहाटे ३ वाजता जाग आल्यावर रोशनी यांना बाळ आणि मोबाईल दोन्हींचा पत्ता नसल्याचे समजले. या धक्कादायक प्रसंगामुळे भयभीत झालेल्या रोशनी यांनी हंबरडा फोडला. त्यांनी बाळाचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला, परंतु बाळ कोठेही आढळले नाही. अखेर, परिसरातील काही जागरूक नागरिकांच्या मदतीने त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रोशनी यांना धीर देत त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७ (२) आणि ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास मडके करत आहेत.

समांतर तपास सुरू

बाळाचे अपहरण करणारा आरोपी एकटा नसावा, त्याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपीने मातेचा मोबाईल चोरल्यामुळे तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा माग काढणे पोलिसांना सोपे झाले आहे. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बाळाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ४ पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली असून, रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. या तपासात एमएफसी पोलिसांसह लोहमार्ग पोलीस (जीआरपी) आणि गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) देखील सक्रियपणे काम करत आहेत. रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संशयित व्यक्ती किंवा बाळाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT