सापाड : योगेश गोडे
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावाजवळ असलेला भंडारी गणेश घाट सध्या अनधिकृत भरावाच्या विळख्यात सापडला असून येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गणेश घाटाकडे जाणारा मुख्य मार्गच अनधिकृत भरावामुळे बंद झाल्याने स्थानिक नागरिक, गणेश मंडळे आणि गणेशभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या गणेश घाटाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
भंडारी गणेश घाट हा कल्याण पश्चिमेतील सर्वात महत्त्वाच्या विसर्जन स्थळांपैकी एक मानला जातो. गांधारी, कोळीवली, खडकपाडा, गोदरेज हिल, आधारवाडी तसेच परिसरातील अनेक भागांतील सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन याच घाटावर केले जाते. प्रत्येक वर्षी हजारो गणेशभक्त या घाटाचा वापर करत असल्याने या ठिकाणाला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घाट परिसरात मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात असल्यामुळे या भरावामुळे घाटाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
परिणामी घाटावरील जेट्टी आणि सुशोभीकरणाच्या कामांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारी गणेश घाटावरील जेट्टीची उभारणी २०१२ मध्ये तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नातून करण्यात आली होती. या जेट्टीमुळे गणेश विसर्जनाबरोबरच स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनाही मोठी सुविधा उपलब्ध झाली होती.
त्यानंतर घाट परिसराचे सुशोभीकरण, रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गणेशभक्तांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी २०२४ मध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून घाट परिसरात सुशोभीकरण, प्रवेशमार्गाची उभारणी आणि गणेशभक्तांसाठी शेड उभारण्यात आले होते. यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु याच गणेश घाटावर काही दिवसापासून अनधिकृत भरावामुळे ही सर्व विकासकामे अक्षरशः मातीमोल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जेट्टीपर्यंत पोहोचणारा मार्ग बंद झाला असून घाटाचा मोठा भाग भरावाखाली गेल्यामुळे भंडारी गणेश घाटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
गणेशोत्सवाला अवघा काही कालावधी शिल्लक असताना घाटाची सद्यस्थिती चिंताजनक आहे. मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्ती तसेच घरगुती मूर्तींच्या विसर्जनासाठी हा घाट अत्यंत महत्त्वाचा असल्याने यंदा विसर्जनाची व्यवस्था कशी होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत भरावामुळे घाटाकडे जाणारा मार्ग बंद राहिल्यास मोठ्या मूर्ती वाहून नेणे अशक्य होईल. यामुळे विसर्जनावेळी नागरिकांची गैरसोय वाढण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात टाकण्यात आलेला भराव हा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला असून, यामागे भूमाफियांचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.