Illegal Tobacco Gutkha Sale Kalyan AI Photo
ठाणे

Kalyan Gutkha Raid | कल्याण-आंबिवलीत प्रतिबंधित गुटखा विक्रीवर कारवाई; तीन टपरी चालकांवर गुन्हे दाखल

खडकपाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल आणि आंबिवली परिसरात छापे

पुढारी वृत्तसेवा

Illegal Tobacco Gutkha Sale Kalyan

डोंबिवली : कल्याण आणि आंबिवली परिसरात पान टपऱ्यांमधून प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या तीन टपरी चालकांविरुद्ध खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

कल्याण पश्चिमेतील काही भागात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या महिला अन्न सुरक्षा अधिकारी एस. बी. आगवणे यांना मिळाली होती. त्यानंतर खडकपाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल आणि आंबिवली परिसरात छापे टाकले.

गोदरेज हिल येथील ‘सिंग पान शॉप’ मधून विमल, सॅफरन, राजश्री, बाजीराव, आरएमडी, रजनीगंधा आदी पान मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. टपरी चालक संतोष पारसनाथ सिंह (वय ५०) याला ताब्यात घेण्यात आले. आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील ‘आमंत्रण पान शॉप’ मधूनही प्रतिबंधित गुटखा जप्त करत राजेश हरिजन (वय २४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच ‘एन. डी. पान शॉप’ मधून विविध ब्रँडचा गुटखा जप्त करून राहुल कुमार चौरासिया (वय ३३) यालाही ताब्यात घेण्यात आले.

या तिघांकडून एकूण सुमारे ११ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात बंदी असतानाही गुटखा विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुटखा साखळीचा पुरवठा कुठून होत होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT