Gun Firing Pudhari
ठाणे

Kalyan Firing Case: व्हॉट्सॲपवर डीपी ठेवण्याच्या वादातून गोळीबार; मोहन्यातील प्रकार

स्वतःवरच गोळी झाडून प्रतिस्पर्ध्याला अडकविण्याचा डाव फसला

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या मोहन्यात धक्कादायक घटना घडली आहे. व्हॉट्सॲप डीपीवर प्रतिस्पर्धी गटातील विरोधकाचा फोटो स्टेट्सला ठेवल्याच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.

मोनू फुलोरे या तरूणावर गोळीबार करून नंतर स्वतःच्याच हातावर गोळी झाडून घेत खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिषेक पवार उर्फ अभी याच्यासह अन्य दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.

मोहने परिसरातील अभिषेक पवार उर्फ अभी आणि गौरव साळुंखे या दोघांमध्ये जुना वाद आहे. 26 मे रोजी दोन्ही गटात भांडण झाले होते. पाटील नगरमध्ये राहणाऱ्या मोनू फुलोरे याने गौरव साळुंखे याच्यासोबतचा फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला होता. वैऱ्याशी सलगी केलेली पाहून अभिषेक उर्फ अभि खवळला होता.

शुक्रवारी रात्री अभिषेक पवार आपल्या 10 ते 12 साथीदारांसह मोनू फुलोरे याला शोधण्यासाठी पाटील नगरमध्ये दाखल झाला. अभिषेक व त्याचे साथीदार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मोनू फुलोरे व त्याचा भाऊ तेथून पळून गेले.

त्यावेळी अभिषेकने मोनूच्या दिशेने दोन राऊंड गोळीबार केला. मात्र या गोळीबारात सुदैवाने मोनू बचावला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आरोपींनी कुठून आणले? या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही तपास सुरू आहे.

स्वतःवर गोळी झाडून बनाव

मोनू फुलोरे याच्यावर गोळीबार केल्यानंतर अभिषेक उर्फ अभिजीत याने स्वतःच्या हातावर एक गोळी मारून घेतली. सुरूवातीला पोलिसांना मोनू फुलोरे याने आपल्यावर गोळीबार केल्याचा कांगावा करत अभिषेक उर्फ अभि याने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात सत्य समोर आले. स्वतःवरच गोळी झाडून घेणाऱ्या अभिषेक पवार याने त्याचा प्रतिस्पर्थी असलेल्या मोनू फुलोरे याला अडकविण्याचा डाव अंगलट आला आहे.

दोन आरोपींना अटक

या संदर्भात एसीपी अशोक होनमाने म्हणाले, व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. आरोपी अभिषेक याने मोनू फुलोरेवर गोळ्या झाडल्या व नंतर स्वतःवर गोळी झाडून मोनूवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक तपास व चौकशीत हा बनाव उघड झाला. आम्ही सोहेल तांबोळी व विजय भुतकर या दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी जखमी अभिषेक उर्फ अवि पवार याच्यावर रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यालाही ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT