डोंबिवली : कल्याण पूर्वेते राहणाऱ्या एका २१ वर्षीय एअर होस्टेसने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी तिच्या २३ वर्षीय एक्स बॉयफ्रेंडविरोधात जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत तरूणीने राहत्या घरातील छताच्या हुकला गळफास घेऊन जीवनत्याग केल्याचे केल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर रोजी रात्री आईने आपल्या मुलीला फोन केला. मात्र मुलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने आईने तत्काळ कल्याण येथील मुलीच्या घरी धाव घेतली. घरात प्रवेश केल्यानंतर मुलीचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिला तातडीने केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांनी तिचा मोबाईल फोन आणि बँक स्टेटमेंट तपासले. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पिडीत तरूणी आणि आरोपी यांच्यात २०२० पासून प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडच्या काळात आरोपीने लग्न करण्यास इन्कार करून तिचे काही खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, आरोपीचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचेही उघड झाले आहे.
चॅट रेकॉर्ड आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासणीत आरोपीने पिडीत तरूणीला मानसिक त्रास देत वारंवार धमकावल्याचे स्पष्ट झाले आहे. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याकडून लाखो रूपये उकळल्याची माहितीही उजेडात आली आहे. पिडीत तरूणीच्या बँक खात्यानुसार १६ डिसेंबर रोजी शेवटचे आर्थिक व्यवहार झाल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०८ अंतर्गत जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एअर होस्टेसच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला तिचा एक्स बॉयफ्रेंड अद्याप हाती लागला नसून पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.