सापाड : कल्याण शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. दैनिक पुढारीने 27 ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या “कल्याणच्या स्मार्ट सिटी रस्त्यावर अनाधिकृत पार्किंग” या बातमीचा मोठा परिणाम झाला असून, या वृत्तानंतर कल्याण वाहतूक विभागाने तत्काळ कारवाई करत स्टेशन परिसरातील अनधिकृत दुचाकी पार्किंगवर दणका दिला.
कल्याण स्टेशन परिसरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाणपुलाखालील सिमेंट काँक्रीट रस्ता तयार झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग ठरू शकला असता. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो शासकीय अधिकार्यांच्या दुचाकी वाहने अनधिकृतरीत्या पार्क केल्याने हा मार्ग नेहमीच वाहतुकीसाठी ठप्प राहत होता. परिणामी स्टेशन परिसरात रोज प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत होती. याच पार्श्वभूमीवर दै. पुढारीच्या बातमीमुळे वाहतूक विभाग जागा झाला आणि गुरुवारी सकाळी कल्याण वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शेकडो दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून अनेक वाहने टोइंग करून हलवण्यात आली आहेत. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान शेकडो अनधिकृत दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अनेक दुचाकी थेट टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेण्यात आल्या. या कारवाईनंतर काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजू मोकळ्या झाल्या असून, रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे स्टेशन परिसरातील वाहनचालक आणि पादचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या मार्गावर वाहतुकीचा प्रवाह सुकर झाला असून, नागरिकांनी वाहतूक विभागाच्या तातडीच्या कृतीचे कौतुक केले आहे.
या कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, स्टेशन परिसरामध्ये जागेची कमतरता असली तरी नागरिकांनी शिस्तपालन करूनच पार्किंग करावे, अन्यथा दंड आणि टोइंग दोन्ही अपरिहार्य ठरतील, असेही सांगण्यात आले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात आधीच शहरातील जागेवर ताण आणत आहे. त्यातच नियमबाह्य पार्किंगमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण होते. त्यामुळे वाहतूक विभागाची ही परिणामकारक कारवाई नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरली आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
या प्रसंगी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की “कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पुढारीच्या बातमीनंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. पुढेही अशा मोहिमा नियमितपणे राबवल्या जातील. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. दैनिक पुढारीच्या वृत्तामुळे अखेर कल्याण स्टेशन परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.