ठाणे

Kalyan Crime : कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याला बेदम मारहाण; दोन पोलिसांवर गंभीर आरोप

जखमी कैद्यावर मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बदलापूर येथील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या तरुणाला कल्याणच्या आधारवाडी कारागृहात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. अक्षय कुरतडकर असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे.

आंघोळीहून परतताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील एका प्रकरणात अटक झालेला अक्षय कुरतडकर सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेच्या दिवशी तो आंघोळ करून आपल्या बॅरेकच्या दिशेने परतत होता. याच दरम्यान तेथे तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या मारहाणीत अक्षयच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तब्बल १६ टाके पडले आहेत.

कुटुंबीयांची कठोर कारवाईची मागणी

या प्रकारानंतर अक्षयची मावशी उज्वला आचरेकर यांनी कारागृह प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच अक्षयच्या सुरक्षेची हमी देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कारागृह प्रशासनाची भूमिका

"या घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदी तपासल्या जात आहेत. जखमी कैद्याला तात्काळ उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमांनुसार आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT