डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेपूर्वी विद्यार्थ्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शाळेतील शिक्षिकेच्या छळाला कंटाळून प्राणत्याग करत असल्याचा उल्लेख केल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. शाळेतील एका शिक्षिकेकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आपल्या पाल्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. (Thane News)
विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा (वय 13) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आपल्या पाल्यांसह कल्याण पूर्वेकडील चिकणी पाडा परिसरात असलेल्या शिवाजी कॉलनीत राहत होता. रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातील आड्याला विघ्नेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. (Thane News)
धक्कादायक बाब म्हणजे विघ्नेशने एक नोटही लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये शाळेतील शिक्षिकेसह एका मुलाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. दोघांनी चिडवल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे विघ्नेश याने नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेची माहिती कळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर विघ्नेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. या घटनेची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. (Thane News)
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश हा त्याचे वडील प्रमोद कुमार, आई आणि बहिणी सोबत कल्याण पूर्वेकडील शिवाजी कॉलनी (चिकणीपाडा) परिसरातील राहत होता. तो कल्याण पूर्वेकडील एका नामांकित शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. रविवारी त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. तर आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने सायंकाळी 7 च्या सुमारास विघ्नेशने टोकाचे पाऊल उचलले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्याजवळ असलेल्या निंबवली गावात राहणारा अनिश दळवी या 16 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून स्वतःला संपविले. लिव्हिंग सर्टिफिकेट घरी पाठवण्याची धमकी दिल्यामुळे अनिशने मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणी कल्याण जवळच्या वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तालुका पोलिसांनी त्यांना अटक केली होती. अशा वाढत्या घटनांमुळे पालक वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही विशिष्ट शाळांमध्ये हा प्रकार घडत असल्याने पालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.