Indian Navy data leak Ravi Verma ATS arrest |
ठाणे : पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला माहिती - पुरविणारा कळव्यातील रविकुमार वर्मा हा एटीएस पथकाच्या ताब्यात असून तो तपासात योग्य ते - सहकार्य करीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने संरक्षण ठिकाणांची अनेकवेळा माहिती पाकिस्तानात पाठवल्याचे समोर आले आहे. मात्र त्याने आपल्या मोबाईल मधील बराच डेटा डिलीट केला असून तो त्याबाबत योग्य ती माहिती तपासात देण्यास टाळाटाळ करीत आहे.
पाकिस्तानी महिला इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला माहिती पुरविणारा कळव्यातील रविकुमार वर्मा हा दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता. त्याने या दोन्ही महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून - वेळोवेळी भारतीय नौदल आणि डॉकयार्ड मधील पाणबुड्या व जहाजाची माहिती पाठवली होती, असे एटीएसच्या तपासातून समोर आली आहे. कळव्यातील रवी वर्मा यास गुरुवारी एटीएस पथकाने अटक केली होती. वर्मा नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता.
पायल शर्मा आणि इस्प्रीत नावाच्या या दोघी महिलांशी त्याची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानंतर हळूहळू रवी वर्मा व या महिलांमध्ये चॅटिंग सुरू झाली. नंतर या महिलांनी रवी वर्माशी व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात साधण्यास सुरवात केली. याच दरम्यान या पाकिस्तानी महिलांनी भारतीय जहाजांची माहिती रविकडून मागितली. माहिती पाठवल्यानंतर प्रत्यक्षात भेटू, असे आमिष दाखवून या महिलांनी वर्माकडून त्यांना हवी ती माहिती वेळोवेळी मागून घेतली होती.
वर्माने पाच जेटी जहाजांसह १४ पाणबुड्या, युद्धनौका, मोठे जहाज, सैन्य दलाच्या शस्त्र साठ्याची ठिकाणाची माहिती, नेव्हीच्या गोडाऊन, मनुष्यबळ अशी अति गुप्त माहिती पाकिस्तानला वेळोवेळी पुरवल्याचा संशय तपास यंत्रणांना असून त्या दिशेने तपास सुरू आहे. मात्र वर्माने आपल्या मोबाईल मधील बराच डेटा नष्ट केला आहे. त्याबाबत तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शनिवारी सकाळी वर्माच्या आईने रितसर परवानगी घेऊन त्याची एटीएस ठाणे कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर दुपारी ठाणे एटीएसच्या कार्यालयातून पथकाने रवींद्र वर्माला मुंबई कार्यालयात पुढील चौकशीसाठी नेले. वर्माच्या पाकिस्तानला कोणकोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली त्या ठिकाणी त्यास प्रत्यक्ष नेऊन तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.