ठाणे : आंध्र प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात विक्री करण्याचा उद्देशाने ठाण्यात वाहतूक करून आणलेला तब्बल 638 किलो गांजा हा ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्ष पथकाने पकडला. एका इनोव्हा कार मधून या गांजाची तस्करी करण्यात येत होती. पोलिसांनी कारसह 2 कोटी 14 लाखाचा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. या गुन्ह्यात एक आरोपी अटक करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
गांजा अमली पदार्थाची एका कारमधून वाहतूक होणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्ष पथकाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना गुप्त बातमीदारकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने 30 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कळवा येथील खारेगाव टोल नाक्यापासून कळवाकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला. यावेळी घटनास्थळी एक इनोव्हा कारवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या कारला घेराव घालून अडवले आणि गाडीची तपासणी केली. यावेळी त्यात तब्बल 638 किलो गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा सर्व गांजा व कार जप्त केली. या गांजाची किंमत 2 कोटी 14 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगीतले. या गुन्ह्यात चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (36, गाजुलाय तांडा, कन्मानूर गाव, ता. मरकेल, जि. मेहबूब नगर, तेलंगणा) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीस ठाणे न्यायालयाने 3 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गांजा थेट ओडीसा, तेलंगना, आंध्रपंदेश राज्यातून वाहतूक करून ठाण्यात आणण्यात आला होता. हा अमली पदार्थ साठा राज्यात कुठे सप्लाय करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास मालमत्ता कक्ष पथक करीत आहे.