शहापूर : शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणार्या या महामार्गावरील काळू नदीच्या पुलावर भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर यावर कायम स्वरूपाची तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीच्या नियंत्रणाखाली शहापूर- मुरबाड-म्हसा-पाटगाव-कर्जत 548- ए या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम अजातगायत सुरु आहे. या मार्गावरील काळू नदीच्या पुलावरील जॉईंट असलेल्या भागातील सिमेंट गळून पडल्याने या पुलावर मोठा खड्डा पडलेला दिसून येत आहे.
या भगदाडात एखाद्या वाहनाचे चाक अडकून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. मुळात हा संपूर्ण रस्ता तयार होतांना कधीही जबाबदार अधिकारी पर्यवेक्षण करताना दिसून आला नसल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत शशांकता दिसून येत आहे.दरम्यान या काळू नदीवरील पुलावर पडलेल्या भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
मागील आठ वर्षापासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षापूर्वी पावसाळ्याच्या आधी घाईघाईने या पुलाचे काम एमएसआरडीसीने पूर्ण केल्याने या पुलाचा सुरुवातीचा भाग खचला आहे.भविष्यातही या पुलामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दत्तात्रय एस.पाटील, उपसरपंच,ग्रुप ग्रामपंचायत दहिवली.