Jitendra Awhad on Election Commission
ठाणे : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह निवडणूक आयोगाला नग्न केले असून निवडणूक प्रक्रियेची देशाला लाज वाटत आहे. आपली लोकशाही ही सत्ताधाऱ्यांची रखेल झाली असून निवडणूक आयोग गुलाम झाले आहे, असे आसूड ओढत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोग हे चोर असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी लोकशाहीची वाट लावल्याचा आरोप केला. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी जनताच उठाव करेल, असाही आशावाद त्यांनी आज (दि.७) पत्रकार परिषेदेत व्यक्त केला.
आदेश श्रीवास्तव यांनी चार वेळा केलेले मतदान, सत्तर वर्षीय वृध्देने पहिल्यांदा मतदार म्हणून केलेले मतदान यासारखे अनेक पुरावे देत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत ६० ते ७० जागांची हेराफेरी केल्याचे आरोप निवडणूक आयोगावर केले आहे. गांधी यांच्या आरोपांचे समर्थन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी महाराष्ट्रातील फुटलेल्या आमदारांना पंखाखाली घेऊन त्यांना पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण दिल्याचा आरोप केला. तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी महाराष्ट्र सरकार वाचविण्याचे काम केले असून त्यांनी संविधानाला पायदळी तुडवित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न धुळीस मिळविल्याचे म्हटले आहे.
जनतेची मालमत्ता असतानाही निवडणूक याद्या, सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. निवडणूक आयोगानेच लोकसभा निवडणुकीत पाडण्याचे आणि जिंकविण्याचे काम केलेले आहे. शेवटच्या तासाभरात ७६ लाख मतदान कसे वाढले यांची माहिती दिली जात नसून चिखली मतदार संघातील सर्वेक्षणात मतदार यादीतील सहा हजार माणसे गावातच राहत नसून लाखो मतदारांची नावे अर्धवट आहेत. कोर्टातही न्याय मिळत नसून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी उघड्या डोळ्यानी नीट बघून निवडणूक आयोगाच्या या गोंधळाबाबत हस्तक्षेप करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.