Anand Paranjpe's counterattack on Awhad's criticism
आनंद परांजपे यांचा आव्हाडांच्या टीकेवर पलटवार Pudhari File Photo
ठाणे

वैफल्यग्रस्तेतून आव्हाड - पवारांचा 200 कोटींमध्ये इमेज मेकओव्हरचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सतत खोटे आरोप करीत असतात. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. 200 कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा अजित पवारांवर त्यांनी केलेला आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून? 2019 साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते. ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असे म्हणायचे का? त्यामुळे आव्हाडांच्या बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्व देत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते तथा ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरूवारी (दि.11) ठाण्यात पत्रकार परिषदेत घेऊन आव्हाड- पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषेदेच्या 11 जागांच्या निवडणुकींमध्ये महायुतीचे 9 उमेदवार जिंकून येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे पहिल्या फेरीत विजयी होतील, असा दावा परांजपे यांनी करून शेकापचे जयंत पाटील हे पराभूत होतील, अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस ही महाविकास आघाडीमध्ये स्वत:ला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला 288 उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा- कळव्यातून तिकीट मागत नाही ना? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे, अशी सुचनाही त्यांनी केली. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. निधी मिळत नसल्याच्या आरोपात तथ्य नसून अजित पवार यांच्यासोबत आव्हाडांची भेट घालून देण्याची माझी तयारी असल्याचेही परांजपे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 55 कोटींचा निधी देण्यात आला होता. आता पुन्हा स्थानिक नगरसेवक, मी आणि नजीब मूल्याच्या मागणीवरून मुंब्रा कळव्यासाठी 50 कोटींचा विकास निधी आला आहे. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत 105 कोटी रुपये मुंब्रा-कळव्यासाठी निधी आल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित पवार यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT