Jawale Beleshwar Temple History Pudhari
ठाणे

Jawale Beleshwar Temple History: श्रीक्षेत्र जावळे येथील श्री स्वयंभू बेलेश्वर देवस्थानाचा जागृत इतिहास

भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या मंदिराला धार्मिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

अनिकेत मोहित

श्रीवर्धन शहर: श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर परिसरापासून काही अंतरावर, निसर्गरम्य डोंगररांगांच्या कुशीत व नदीकिनारी वसलेले जावळे हे ऐतिहासिक गाव आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या या गावात श्री स्वयंभू बेलेश्वर जागृत देवस्थान असून, या मंदिराला धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे.

ग्रामस्थांच्या पूर्वजांकडून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते. पूर्वी जावळे परिसरात दाट जंगल होते. मळेकर, शिगवण आणि भोसले कुटुंबीयांचा या परिसराशी जुना संबंध असून, त्या काळात ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती व गुरेढोरे पालन हा होता.

देवस्थानाच्या इतिहासाशी संबंधित आख्यायिकेनुसार मळेकर कुटुंबातील एक गुराखी दररोज गुरे चारण्यासाठी या जंगल परिसरात जात असे. सायंकाळी गुरे परत आणताना त्यातील ‘कपिला’ नावाची गाय नेहमी अचानक गायब होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. अनेक दिवस हा प्रकार घडत राहिल्यानंतर गुराख्याने त्या गाईवर पाळत ठेवली.

दाट झाडीत असलेल्या एका ठिकाणी ती गाय जात असल्याचे त्याने पाहिले. तेथे गेल्यानंतर त्याला एक अद्भुत दृश्य दिसले. एका पाषाणरूप पिंडीवर कपिला गाय स्वतःहून दुधाचा पान्हा सोडत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार त्याने ग्रामस्थांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी साफसफाई केली.

त्यावेळी तेथे श्री स्वयंभू बेलेश्वराची पिंड तसेच गणपती आणि नंदीच्या मूर्ती आढळून आल्याचे ग्रामस्थ सांगतात. यानंतर कुडाच्या भिंतीचे छोटे मंदिर उभारण्यात आले. कालांतराने या देवस्थानाची ख्याती परिसरात पसरली. श्रीवर्धन तालुक्यासह आसपासच्या भागातील भाविक श्रावण महिन्यात श्रद्धेने बेलेश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागले.

या महिन्यात सोमवार, रुद्राभिषेक, जलाभिषेक आणि विविध धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. त्यामुळे श्रावण महिन्यात श्री स्वयंभू बेलेश्वर मंदिरात भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. मंदिरात रुद्राभिषेकासह विविध पूजा-विधी श्रद्धापूर्वक पार पडतात. शिवभक्तांकडून बेलपत्र, जल आणि विविध पूजासाहित्य अर्पण करून बेलेश्वराचे दर्शन घेतले जाते.

ग्रामस्थांच्या संकल्पनेतून, देणगीदार व शिवभक्तांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या भव्य आणि मनमोहक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा १७ मे २०२३ रोजी संपन्न झाला. या कामासाठी देणगी, वस्तुरूपाने मदत तसेच विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्या शिवभक्तांचे आणि जावळे ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

आज श्री स्वयंभू बेलेश्वर देवस्थान हे जावळे गावाच्या धार्मिक ओळखीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. श्रद्धा, आख्यायिका आणि निसर्गरम्य परिसर यांचा सुंदर संगम असलेल्या या देवस्थानाकडे भाविकांची वाढती वर्दळ पाहायला मिळते. मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान, अशी भाविकांची श्रद्धा असून, श्री बेलेश्वराच्या दर्शनासाठी अधिकाधिक भाविकांनी जावळे येथे यावे, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.

नागदेवतेचे वास्तव्य असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम तब्बल १८ महिने सुरू होते. या काळात ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने आणि एकजुटीने मंदिराचे काम पूर्ण केले. मंदिराच्या कळसाच्या कामानंतर परिसराला वेगळे धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.

या देवस्थानाशी संबंधित आणखी एक श्रद्धेची बाब म्हणजे नागदेवतेचे वास्तव्य असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा. आषाढी अमावस्या आणि श्रावण महिन्यात मंदिर परिसरात नागदेवतेचे दर्शन होत असल्याचे भाविक सांगतात. नागदेवता मंदिरातील विविध ठिकाणी वावरते, अशी स्थानिकांची श्रद्धा असून, या काळात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT