बुचर आयलँडमधील बोट दुर्घटनेनंतर सागरी जलवाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Pudhari News network
ठाणे

Janatecha Jahirnama | सागरी जलवाहतूक प्रवासी सुरक्षा ऐरणीवर

अपघातात 13 प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूमुळे सुरक्षा ऑडिटचा प्रश्न आला समोर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सागरी सुरक्षा हा प्रश्न अनेकदा चर्चिला जात असतो, मात्र आता बुचर आयलँडमधील बोट दुर्घटनेनंतर सागरी जलवाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांना बोटीत बसल्यानंतर जॅकेट दिले जात नाही किंवा त्यांच्या आसन व्यवस्थांच्या जवळ सुरक्षा जॅकेट नसतात त्यामुळे बोट दुर्घटनेत मृत्यूचे प्रमाण वाढते, याचा अनुभव बुधवारी (दि.18) बुचर आयलँडवरील मृत्यूच्या थराराने आला.

जलवाहतूक करताना बोटीची प्रवासी क्षमता लक्षात न घेता अतिरिक्त प्रवासी घेणे आवश्यक त्या उपाययोजनेसाठी प्रवाशांना जॅकेट किंवा सुरक्षेची अन्य उपाययोजना न करणे असे अनेक प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यामुळे जलवाहतूक करणार्‍या बोटींचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. दुर्घटना झालेल्या बोटींमध्ये किंवा सध्या सुरू असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ऑफ इंडिया ते उरण, भाऊ चा धक्का ते रेवस, रेवस ते उरण, गेट वे ऑफ इंडिया ते मुंबई अशा विविध मार्गावर सुरू असलेल्या बोटींची सुरक्षा अधिक प्रभावी करणे आवश्यक झाले आहे.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाप्रसंगी झालेल्या बोट दुर्घटनेनंतर सागरी प्रवासातील ढिसाळपणा समोर आला होता. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा व मांडवा दरम्यानच्या प्रवासी बोटीत प्रवाशांना लाइफ जॅकेट घालणे सक्तीचे केले गेले होते. मात्र तरीही सुरक्षा उपाययोजना कमी असल्याने मृतांचा आकडा वाढला. धक्कादायक बाब म्हणजे ही सक्ती यापूर्वी केली जात नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे.

गेट वे ते मांडवा व एलिफंटादरम्यान रोज 100 बोटी प्रवाशांची वाहतूक करतात. या बोटींची प्रवासी क्षमता 100, 80 व 65 अशी असते. अनेकदा जास्त संख्येने प्रवासी बसवले जातात, असा आरोप होतो. मात्र, बोटचालक या आरोपाचे खंडन करतात. बोटींमध्ये पुरेशा संख्येने लाइफ जॅकेट असतात का, याविषयी शंका उपस्थित केली जाते. गेट वे ते एलिफंटा हा प्रवास सुमारे अर्ध्या तासाचा आहे. तर गेट वे ते मांडवा हा प्रवास 1 तासाचा आहे. खरे तर बोटीत प्रवेश केल्यानंतर आपत्कालीन प्रसंगात कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी सादरीकरण गरजेचे असते, पण तसे केेले जात नाही. किमान लाइफ जॅकेट कसे वापरायचे याची कल्पना प्रवाशांना द्यायला हवी. परंतु अशा प्रकारचे कोणतेही सादरीकरण होत नाही.

बोटीला अचानक अपघात झाला तर गोंधळ उडतो. या गोंधळता लाइफ जॅकेट कोठे आहे, ते कसे परिधान करायचे, याविषयी प्रवाशांना माहितीच नसते. लाइफ जॅकेट विषयी बोटीतील सहाय्यक सूचना करत नाहीत आणि प्रवासीही लाइफ जॅकेट देण्याचा आग्रह धरत नाहीत. काही प्रवासी तर फोटो काढायचे असल्याने लाइफ जॅकेट टाळतात, असेही सांगण्यात येते. मात्र कालच्या अपघातानंतर आपल्याकडे सुरक्षिततेसाठी फारसे उपाय नसतात हेही पुढे आले. लहान मुले आणि वयोवृद्ध यांना अशा अपघातात अधिक फटका बसतो. कालच्या अपघातातही हीच स्थिती पुढे आली.

अपघात का होतात?

बोटींचा समुद्रातील मार्ग ठरलेला असतो. मात्र एखादी बोट ठरलेला मार्ग सोडून दुसर्‍या मार्गाने गेल्यास अपघाताची शक्यता वाढते. मार्ग सोडलेली बोट खडक असलेल्या भागात जाण्याची शक्यता असते. शिवाय अचानक बोटीने मार्ग बदलल्यास विरुद्ध दिशेने येणार्‍या बोटीसाठीही ते धोकादायक ठरून टकरीची शक्यता वाढते.

सुरक्षित मार्ग

जवळपास दोन हजार बोटी समुद्रात मच्छिमारी करतात. दीपस्तंभापासून एक किलोमीटर अंतरावरचा भाग हा सुरक्षित आहे. मात्र अलीकडे आल्यास खडक लागतो. मच्छिमारांच्या बोटी राजभवनपासून साधारणपणे 1000 मीटर अंतरावरून मच्छिमारीसाठी जातात. हा मार्ग प्रवासासाठी सुरक्षित मानला जातो.

गेटवेवरची बजबजपुरी

1 ते 4 क्रमांकाच्या जेट्टीवरून प्रवासी वाहतूक होते. मात्र एकाच वेळी अनेक बोटी तेथे थडकतात. साहजिकच एक बोट निघाल्याशिवाय दुसर्‍या बोटीला जेट्टीलगत येता येत नाही. त्यामुळे बोटी एकमेकींना खेटून उभ्या राहतात. मग हिंदकळणार्‍या एका बोटीतून दुसर्‍या बोटीत जाण्याची धोकादायक कसरत प्रवाशांना करावी लागते. या बजबजपुरीला आळा घालण्यासाठी मध्यंतरी मेरिटाइम बोर्डाने आराखडा तयार केला होता. परंतु त्यावर पुढे काही झाले नाही.

दरवर्षी तपासणी

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दरवर्षी प्रत्येक बोटीची तपासणी होते. इंजीन, अन्य यंत्रे, आसनव्यवस्था, सुरक्षा उपकरणे आदींची पाहणी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. बोटींची वर्षातून एकदा कोळसा बंदर, रे रोड येथे दुरुस्ती होते, अशी माहिती गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष किफायत मुल्ला यांनी दिली.

बोटींचे आयुर्मान

सागाच्या लाकडापासून बनलेल्या बोटी 15 वर्ष तग धरू शकतात. त्यानंतर खिळे किंवा अन्य धातू गंजतात. लाटांच्या तडाख्यांमुळे लाकडाचीही हानी होते. खार्‍या पाण्याने पत्रा सडतो. जेट्टीजवळ बोटी येताना अनेकदा जेट्टीच्या भिंतीला घर्षण होऊन लाकडाची झीज होते. त्यामुळे आयुर्मान सरले की या बोटी भंगारात काढाव्या लागतात. तरीही त्या बोटी तात्पुरती डागडुजी करून वापरल्या जातात, असे कळते. फायबरच्या बोटींचे आयुर्मान जास्त असते.

या बोटी खासगी मालकीच्या असतात. फार तर 5 ते 15 लोक या बोटीवर मावतात. या बोटी खासगी समुद्र सफरीसाठी वापरल्या जातात. मात्र, काही बोटी गुपचूप प्रवासी वाहतूक करतात, अशी चर्चा आहे. समुद्र जिथे खोल आहे, तेथूनच फायबरच्या बोटींना मार्गक्रमणा करावी लागते. कारण या बोटी खडकाला आदळल्यास लगेचच फुटतात आणि बुडतातही लवकर.

लाइफ जॅकेटची सक्ती

प्रवाशांना लाइफ जॅकेट घालण्याची सक्ती केली जाणार आहे, असे त्यावेळी किफायत मुल्ला यांनी सांगितले होते. अनेकदा आग्रह करूनही प्रवासी जॅकेट घालण्याचे टाळतात. त्यामुळे सक्तीसाठी मेरिटाइम बोर्डाला संघटना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT