ठाणे : ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जांभळे पिकत असली तरी बदलापूरच्या जाभळांना विशेष भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. बदलापूर शहरात भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून जांभळाचे संशोधन करण्यात आले होते. यावेळी बदलापूरचे जांभूळ हे विशेष चवीचे असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
मधुमेह या आजाराशी लढण्याची ताकद जांभळामध्ये असल्याने मधुमेह असणाऱ्या रुग्णांनाही याचा फायदा होतो. बदलापूरच्या जांभळांना विशेष मागणी असल्याने यंदा ही जांभळे लंडनच्या बाजारात दाखल झाल्याची माहिती जांभूळ परिसंवर्धन केंद्राचे प्रमुख आदित्य गोळे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील बाजारात विविध प्रकारची जांभळे येत असली,तरी बदलापूरची जांभळे ही सरळ आणि गोड असल्याने येथील हलवी आणि गरवी जातीच्या जांभळांची मागणी वाढली आहे. यंदा पहिल्यांदाच कर्नाटकच्या अपेडा या संस्थेच्या वतीने भारतातील विविध प्रजातीची जांभळे लंडन येथे पाठवण्यात आली आहेत. यात बदलापूरच्या जांभळांचाही समावेश आहे.
तसेच बदलापूर येथून दहा किलो जांभळे ही प्रायोगिक तत्त्वावर लंडन येथे पाठवण्यात आली आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाच बदलापूरमधील जांभळे ही आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात झाली आहेत. त्यामुळे जांभळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आता दरवर्षी जांभळाच्या रोपांची लागवड जास्त प्रमाणात केली जाईल अशी माहिती जांभूळ परिसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष आदित्य गोळे यांनी दिली. तसेच जांभूळ हे सातासमुद्रापार पोहोचवल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनीही संबंधीत शेतकऱ्यांचे आणि संस्थेचे अभिनंदन केले आहे.
बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जांभळांची शेती करणारे शेतकरी आहेत. जांभळाचे पीक मे आणि जून महिन्यात येत असते. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच वादळी वाऱ्यासकट पाऊस झाल्याने अतिशय कमी प्रमाणात जांभळाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे जांभळाची शेती करणाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. बदलापूरच्या जांभळाच्या वाढत्या मागणीचा आणि दर्जाचा विचार केला, तर बदलापूरमध्ये जांभळाचे संशोधन केंद्र उभारण्याची मागणी आदित्य गोळे यांनी केली आहे.