वाडा : मच्छिंद्र आगिवले
माणसाप्रमाणे पक्षी बोलतात या घटना नवीन नसल्या तरी वाड्यातील गारगाव गावात चक्क एक कावळा माणसाप्रमाणे बोलत असून सध्या हा मोठा कुतूहलाचा विषय बनला आहे.
एका फार्म हाऊसमध्ये राहणार्या कुटुंबासोबत हा कावळा राहत असून तो काव काव सोबत लहर आली की घरातील माणसांना आवाज देतो. सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्याने आता कावळ्याला बघायला अचानक माणसांची रीघ लागत असून कावळ्यासाठी ही धोक्याची घंटा बनली आहे.
गारगाव गावातील एका फार्म हाऊसमध्ये राहणार्या मंगल्या मुकणे यांच्या मुलांना तीन वर्षांपूर्वी आलेल्या वादळी वार्यात जखमी अवस्थेत पडलेले कावळ्याचे लहान पिल्लू सापडले होते. घरातील सर्व सदस्यांनी या पिल्लाला मायेने वाढवले व त्याचे नाव काल्या असे ठेवण्यात आले. साधारण अडीच महिन्यांपासून अचानक लहर आली की, हा कावळा मुलांच्या बोलण्याची नक्कल करतो असे लक्षात आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले व घरातील सर्वांनी या कावळ्याला अधिक बोलायला शिकवले.
संजय लांडगे यांनी आपल्या sanjay.landge.71 या आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेयर केला आहे.
गावातील एका तरुणाने या कावळ्याचा व्हीडिओ काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केला व सध्या हा काल्या भलताच प्रसिद्ध झाला आहे. खरेतर पोपट व कोंबडा बोलतो असे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत, मात्र कावळ्याचा हा पहिलीच व्हीडिओ असल्याने लोकांची या काल्याला भेटायला रिघ लागली आहे. काका, काल्या, बाबू, सरगम, परतू, आई, खोटा तू... अशा माणसांसारख्या अनेक आवाजाची काल्या हुबेहूब नक्कल करत असून खोकला झाल्यासारखा तो खोकून देखील अनेकांना चकित करतो.
मायेने जीव लावला की, पक्षी देखील माणसाशी एकरूप होतो याचे हे जिवंत उदाहरण असून घरातील व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता, तीन वर्षांपासून तो इथेच खातो, बाजूच्या झाडावर रात्री राहतो मात्र सोबत खेळणार्या आपल्या बांधवांसोबत जाण्याचे नाव घेत नाही. व्हीडिओ व्हायरल झाल्याने लोकांची रीघ लागली असून काल्या हळूहळू दुरावत चालला आहे. लोकांची होणारी गर्दी व त्याला दिले जाणारे खाद्यपदार्थ यामुळे कावळ्याचे जीवन संकटात येण्याची शक्यता असून कुटुंब याच चिंतेत आहे. बोलक्या कावळ्याची ही घटना मात्र लोकांना चकित करीत असून सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.