ठाणे

Thane News | विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनाची सलामी जुन्याच गणावेशावर ?

पुढारी वृत्तसेवा
मोखाडा: हनिफ शेख

शाळा सुरू झाल्यानंतर नवीन वर्षासाठी तत्काळ गणवेश वाटप व्हावे, म्हणून आजवर शासन शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देत होते. यानंतर किमान 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी नव्या गणवेशात विद्यार्थी ध्वजारोहण करीत असते. मात्र या प्रक्रियेबाबत कोणाचीही कसलीही तक्रार नसताना शासनाने कापड पुरवठा करण्यासाठी एकाच ठेकेदार कंपनीला हे काम दिले आहे.

शासन एखादी योजना बंद किंवा नवीन चालु करते त्यावेळी त्यामधील त्रुटी दुरुस्त करणे किंवा गुंतागुंतीची न होता सुखकर प्रक्रिया राबवली जावी हा उद्देश असतो. पात्र सुरळीत योजना बंद करून अतिशय गुंतागुतीची प्रक्रिया करत राज्यभरासाठी कापड पुरवठा करण्यासाठी एकाच कांत्राटदाराची निवड करण्यात आली. या नवीन आदेशामुळे गोंधळ होत असल्याचे समोर येत आहे.

एकाच ठेकेदार कंपनीला ठेका दिल्याने कंत्राटदार सदर कपडा महिला औद्योगिक महामंडळ यांना देवून शिवून घेणार असल्याचे कळते तर दूसरा गणवेश कापड पुरवठा करून व्यवस्थापन समितीने शिवून घ्यायचा आहे, मात्र स्काऊट गाईड गणवेश हा दोन खिसे, खांद्यावर बंध, असा असल्याने 100 रुपये एवढी शिलाई निश्चित केल्याने तेवढ्या रुपयांत हा ड्रेस शिवून द्यायला कोणीही तयार नसल्याने सदरचे कापड पंचायत समिती स्तरावर येवून पडले आहे. मात्र शाळा व्यवस्थान समिती यांना एवढ्या कमी पैशांत शिवून द्यायला कोणीही तयार नसल्याने आता विद्यार्थी मात्र नव्या गणावेशापासून अद्याप पर्यंत वंचित आहेत. यामुळे सुरळीत चाललेली गणवेश वाटप प्रक्रिया कोणाच्या फायद्यासाठी बदलली आणि विद्यार्थी गणेवशापासून वंचित ठेवण्याचे काम कोणाचे असा सवाल उपस्थित होत आहे.

मोखाडा तालुक्यात जवळपास 154 शाळा आणि त्यामध्ये 9 हजारांंहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अगोदर प्रत्येक शाळेला एका गणवेशासाठी 300 रुपये एवढा निधी दिला जात होता प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश या प्रमाणे हा निधी येत होता अशावेळी गावतील टेलर किंवा स्थानिक व्यापारी यांच्याकडून या गणवेशाची खरेदी होत होती अशावेळी जास्त पट असलेल्या शाळेत व्यापार्‍यांकडून गणवेशसह टाय बूट अशा वस्तूही दिल्या जात असे यामुळे सुलभ खरेदी, स्थानिक व्यापार्‍यांना रोजगार शिवाय कापडाच्या दर्जाबाबत ही समजून उमजून खरेदी केली जात होती एखाद्या विद्यार्थ्यांचे उशीरा प्रवेश झाला तर त्यालाही नंतरहून गणवेश घेता येत होता.

मात्र शालेय शिक्षण विभागाने या वर्षी पासून राज्यभरासाठी कापड पुरवठा करण्यासाठी एकाच कांत्राटदाराची निवड केली एक ड्रेस महीला औद्योगिक महामंडळाकडून तर एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने शिवून घ्यायचा असा शासकीय आदेश आहे. यासाठी 100 रुपये शिलाई आणि 10 रुपये प्रवासखर्च असा निधी देण्यात आलेला आहे मात्र एवढ्या कमी पैशात हा गणवेश शिवून द्यायला कोणीही तयार नाही याबाबत जवळपास एकट्या मोखाडा तालुक्यातील 60 टक्केहून अधिक शाळांनी नकार दिल्याची माहिती आहे. यामुळे यासाठी आलेले कापड मात्र पडून आहे. शिवाय या कापडाच्या दर्जाबाबत अधिवेशनात सुध्दा अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आता गतवर्षांसारखीच खरेदी पुन्हा व्हावी अशी मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT