डॉ. महेश केळुसकर
मातृभाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही. साहित्य, कविता, संगीत व अन्य कला या मातृभाषेतूनच मनाच्या गाभ्याला भिडतात, कारण त्या भाषेत संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली असतात. सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मातृभाषा आवश्यक असते. आपल्या कलात्मक योगदानातून कोणतीही भाषा सांस्कृतिक जगात महत्त्वाचं स्थान प्राप्त करत असते. भाषा ही सक्षमीकरण आणि समावेशकतेचं साधन आहे.
तुमच्या खांद्यावर कुठल्याही पक्षाचा, जाती-धर्माचा झेंडा असूद्यात, पण त्याचा दांडा मात्र मराठीच ठेवा, असं आवाहन 99व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी 20 डिसेंबरच्या संध्याकाळी नॅशनल लायब्ररीने आयोजित केलेल्या शब्दोत्सवात केलं. त्याआधी नॅशनल लायब्ररीचे विद्यमान अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शब्दोत्सवाचं उद्घाटन केलं. माझ्या मराठी मातीचा टिळा या लेखसंग्रहाचं प्रकाशन विश्वास पाटील यांच्या हस्ते झालं.
त्यानंतर महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे या विषयावर व्याख्यान देताना पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं मराठी स्वराज्य हाही एक जागतिक वारसाच आहे आणि 107 हुतात्म्यांनी बलिदान करून मिळवलेली मुंबईसुद्धा मूळची मराठीच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातूनच शिक्षण द्यावं, असं कळकळीचं आवाहनही पाटील यांनी भाषणामध्ये केलं.
बऱ्याच दिवसांनी लायब्ररीचं सभागृह हाऊसफुल्ल झालेलं पाहिलं. शब्दोत्सवात पाच दिवस वेगवेगळे मराठी साहित्यिक कार्यक्रम झाले आणि त्याला रसिकांची चांगली उपस्थितीही लाभली. मराठी साहित्यविषयक आणि भाषाविषयक कार्यक्रमांना जर अशीच मराठी मंडळी येत राहिली तर ती आशादायक गोष्ट होईल. मराठी भाषा अभ्यासकेंद्राने सध्या मराठी शाळा वाचवा ही मोहीम हाती घेतलेली आहे.
अलीकडेच त्यांनी हुतात्मा चौकात मोठं आंदोलन केलं. पण, त्यात मराठी सिनेमा, नाट्य क्षेत्रातील सेलिब्रेटीज आवाहन करूनही सामील नव्हते. ते जर उपस्थित राहिले, तर या मोहिमेला अधिक बळ मिळेल. पण, भाषेच्या अस्मितेसाठी मराठी कलाकारांना एकत्र येण्याची सवय दिसत नाही आणि त्यामुळेच परभाषिकांना मराठी समाजावर अन्याय करत राहण्यास उत्तेजन मिळतं. मराठी भाषा टिकली, तरच मराठी नाटकांना, मराठी सिनेमांना प्रेक्षक येतील ना? त्यासाठी पहिल्यांदा मोठमोठ्या मराठी लोकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये घातलं पाहिजे आणि त्याची जाहिरातही केली पाहिजे. ही चळवळ जोरदार झाली तर मराठीचा दांडा मजबूत होईल यात शंका नाही.
मंगळवारी 23 डिसेंबरला शब्दोत्सवात बोलतो मराठी हा परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै होते. कमलेश सुतार, समीक्षक डॉ. गीता मांजरेकर आणि मराठी आठव दिवस चळवळीचे संस्थापक रजनीश राणे यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयक आपापले विचार या परिसंवादात मांडले. जोपर्यंत काळजात मराठी घेऊन वावरणारे कार्यकर्ते या भूतलावर आहेत, तोपर्यंत मराठीचे काय होणार? याची भीती बाळगण्याची अजिबात गरज नसल्याचे ठाम प्रतिपादन राजेंद्र पै यांनी केले. विविध दाखले देत त्यांनी मराठीची महती सांगितली. मराठी ही प्रयोगशील भाषा आहे, म्हणून ती प्रभावी असल्याचे सांगून ते म्हणाले, आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखनात असेच अनेकविध प्रयोग केले व ते यशस्वीही केले.
मराठीतील अनेक सौंदर्यस्थळेही त्यांनी यावेळी उलगडून दाखवली. कमलेश सुतार यांनी मराठी भाषा व माध्यमाची ताकद याचं विवेचन करताना शाळेतील हिंदी भाषा सक्तीच्या प्रकरणाचा दाखला दिला. मराठी आठव दिवस या चळवळीचे प्रणेते रजनीश राणे यांनी आपण मराठी होणे विसरलोय आणि म्हणूनच मराठी म्हणून आपण जगत नाही, असं प्रतिपादन केलं. मराठी बोला, मराठी वाचा, मराठी लिहा ही त्रिसूत्री जर प्रत्येक मराठी माणसाने अंगिकारली तर जगातील मराठी भाषा कधीच मरणार नाही असं राणे ठामपणे म्हणाले. समीक्षक डॉ. गीता मांजरेकर यांनी आपल्या भाषणात बोली भाषा जगायला हवी तरच मराठी जिवंत राहील असं सांगितलं.
मराठी ही नदी असेल तर बोलीभाषा या तिला येऊन मिळणारे अनेक प्रवाह आहेत, अशी मांडणी करून त्यांनी हे लहान प्रवाह आधी जिवंत ठेवायला हवेत, तरंच नदी आटणार नाही, असं सांगितलं. भाषेला प्रमाण, शुद्ध, अशुद्ध या चक्रात अडकवू नका. भाषेतील व्याकरण लिहिताना पहावं, पण ऐकताना त्याला फुटपट्टी लावू नये असंही त्यांनी बजावलं. परिसंवादाचा सारांश काय होता तर मराठीचा दांडा मजबूत पाहिजे. मराठी भाषेबाबत निराशाजनक मांडणी आता सोडून दिली पाहिजे.
वारंवार उदासीनता व्यक्त होत राहिली तर मराठी भाषक समाज अधिकाधिक न्यूनगंडाने पछाडला जाईल आणि म्हणूनच पुणे पुस्तक महोत्सवसारखे उपक्रम पाहिले की, मराठीबाबत खरोखरंच आशा वाटू लागते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचं हे तिसरं वर्ष. 13 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव जोरात चालला. सुमारे अकरा लाख वाचकांनी या महोत्सवाला एका आठवड्यात भेट दिली. त्यामध्ये 70 टक्के तरुण होते. 800 बुक स्टॉल आणि 50 लाख पुस्तकांच्या प्रदर्शनाचं आयोजन करून प्रवर्तक राजेश पांडे यांनी वाहवा मिळाली. या पुस्तक महोत्सवाच्या अप्रतिम आयोजनाबाबत राष्ट्रीय पुस्तक न्यासाला म्हणजेच नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया या संस्थेलाही धन्यवाद दिले पाहिजेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इस्रो गगनयान अंतराळवीर हवाई दल ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या मुलाखती हे पुस्तक महोत्सवाचं आकर्षण होतं.
मातृभाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही. साहित्य, कविता, संगीत व अन्य कला या मातृभाषेतूनच मनाच्या गाभ्याला भिडतात, कारण त्या भाषेत संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली असतात. सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मातृभाषा आवश्यक असते. आपल्या कलात्मक योगदानातून कोणतीही भाषा सांस्कृतिक जगात महत्त्वाचं स्थान प्राप्त करत असते. भाषा ही सक्षमीकरण व समावेशकतेचं साधन आहे. एखाद्याला जर सार्वजनिक चर्चेत भाग घेता आला, माहिती मिळवता आली व निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आलं, तरच समाजात त्याचा आवाज ऐकला जातो. हा असा प्रत्येकाचा आवाज ऐकला गेला तरच समतोल साधला जातो.
अनेकदा विचारलं जातं की, “ज्यावेळी सगळं जग इंग्रजीनं व्यापलेलं आहे, त्यावेळी आमच्या मुलांनी का म्हणून मातृभाषेवर लक्ष केंद्रित करावं?” आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी ही केवळ एक भाषा न राहता शिक्षण, व्यवसाय व डिजिटल संवादाचं प्रमुख साधन ठरली आहे. केंब्रिज इंग्लिशच्या अहवालानुसार, जिथं इंग्रजी ही अधिकृत भाषा नाही अशा देशांतही 95 टक्क्यांहून अधिक लोक इंग्रजीचं महत्त्व मान्य करतात. पण, म्हणून मुले त्यांच्या मातृभाषेपूर्वीच इंग्रजी शिकू शकतात का? तुमची मातृभाषा चांगली असेल तरच तुम्ही इंग्रजी भाषेवर किंवा कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता. मातृभाषेतील शिक्षणामुळे केवळ भाषेचाच नव्हे, तर मेंदूचा विकासही अधिक गतिमान होतो.