डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या कर्णिक रोडवर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, ठेले, आदी फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. फुटपाथ व्यतिरिक्त देखील टेबल खुर्च्या टाकून रस्ते काबिज करण्यात आले आहेत.
नेहमीच गजबजलेल्या या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ आधीच वाहतुकीची कोंडी झालेली असते. त्यातच फेरीवाल्यांनी सर्वत्र हात-पाय पसरल्यामुळे चिंचोळ्या झालेल्या या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवरून चालणेही मुश्कील होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात कल्याणचे जागरूक रहिवासी असलेल्या विक्रमसिंग परदेशी यांनी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचे मेसेजद्वारे लक्ष वेधले आहे.
कर्णिक रोड परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात काही दुकानदारांकडून रस्ता आणि फूटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी केडीएमसी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. या परिसरातील वडा-पाव, बिर्याणी, डोसा, ऊसाची गाडी, ताक/लस्सी, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या आणि भाजीचे टेम्पो रस्त्याच्या दुतर्फा उभे करून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. त्यातच तेथील काही फूड स्टॉलधारकांकडून तर चक्क रस्त्यावर टेबल/खुर्च्या मांडून त्यावर ग्राहक बसवले जातात.
या पार्श्वभूमीवर दक्ष रहिवासी विक्रमसिंग परदेशी यांनी कर्णिक रोड वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचे मेसेजद्वारे लक्ष वेधले आहे. या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहनांची पार्कींग केली जात असल्याची तक्रार परदेशी यांनी केडीएमसीकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झालेली काही बोलकी छायाचित्रे देखिल आयुक्तांना माहितीकरिता पाठवली आहेत. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस या संदर्भात काय कारवाया करतात ? याकडे परिसरातील त्रस्त रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची शक्यता
या परिसरात सतत ट्रॅफिक जाम, कर्णकर्कश हॉर्नचा त्रास आणि नेहमी उद्भवणारे वादाचे प्रसंग रहिवाशांसाठी विशेषत: आजारी, वृध्द आणि लहान बालकांसाठी डोकेदुखीचे ठरले आहेत. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग मिळत नाही. या भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मोठा धोका निर्माण होण्याची भिती देखिल विक्रमसिंग परदेशी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने अशी अतिक्रमणे तातडीने हटवून नो-पार्किंगचे जाजोजागी फलक लावावेत. तसेच या भागातील रस्त्यांवर वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही अपेक्षा परदेशी पोलिस व्यक्त केली आहे.