पाण्याचे टँकर गावात दाखल होताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. किमान आठवडाभर तरी पाण्याची चिंता मिटल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. pudhari photo
ठाणे

Water Crisis : सात संस्थांच्या एकजुटीतून कोठारे गावाला जलसंजीवनी

प्रत्येक थेंब अनमोल...डोंबिवलीकरांनी भागवली 300 कुटुंबांची तहान

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पाण्यासाठी आमची 5-7 किलोमीटर रात्रं-दिवस धावपळ सुरू असते. आज टँकर पाहून डोळ्यांत पाणी आलं...कोठारे गावातील एका आदिवासी महिलेच्या या शब्दांत आयडेंटिटी वॉटर फॉर लाईफ या मोहिमेचे यश सामावले आहे.

शहापूरच्या दुर्गम आदिवासी पाड्यात सात सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन 10 हजार लिटरहून अधिक पिण्याचे पाणी पोहोचवून 300 कुटुंबांना जीवनदान दिले. या भागातील आदिवासी बांधवांची वणवण थांबली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, ही सारी किमया डोंबिवलीकरांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे.

कोठारे गावात पाण्यासाठी होणारी महिलांची रोजची वणवण आज थांबली आहे. कडक उन्हात डोक्यावर हंडे घेऊन 5-7 किमीची पायपीट करणाऱ्या माता-भगिनींसाठी ही मोहीम मोठा दिलासा ठरली. ही केवळ जलदान मोहीम नाही, तर शाश्वत बदलाची सुरूवात आहे.

आयडेंटिटी, जीजीयूएस फाऊंडेशन, हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी, वेब ब्रिगेड टेक सोल्यूशन्स, वी-देसी टेक्नॉलॉजीज्‌‍ , हिरकणी महिला सायकल क्लब आणि स्पनुधा फाऊंडेशन या सात संस्थांनी प्रत्येक थेंब अनमोल आहे, या भावनेतून हातमिळवणी केली.

आमचा उद्देश फक्त पाणी देणे नाही, तर आरोग्य सुधारणा घडवणे, आशा निर्माण करणे आणि या भागात कायमस्वरूपी बदल घडवणे हा आहे, असे आयडेंटिटी ॲपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन

या मोहिमेला जीजीयूएस फाऊंडेशनचे गगन शिंदे, स्पनुधा फाऊंडेशनचे प्रतीक आंबेकर, मनीषा सुर्वे, हिरकणी महिला सायकल क्लबच्या सचिवांसह प्रणिता भोसले, समृद्धी राणे, जयवंत सुर्वे आणि हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी श्रमदान करून पाण्याचे वाटप केले. दुर्गम भागातील पाण्याचे भीषण वास्तव समोर आणणारी आणि चला...एकत्र येऊन तहान भागवूया...हा संदेश देणारी ही मोहीम सामाजिक एकजुटीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT