ठाणे : राजस्थानमधील झुनझुन येथे सुरू असलेली एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी मीरा-भाईंदर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त करून 11 आरोपींना अटक केली आहे. त्यातील काहींचा संबंध थेट डी गँगशी म्हणजेच दाऊद टोळीशी असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींकडून एमडी ड्रग्ज, त्यासाठी लागणारी रसायने आणि उत्पादन सामुग्रीसह शंभर कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी काही जण दाऊद टोळीशी संबंधित आहेत. त्यांच्यावर खून, ड्रग्ज विक्रीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थविरोधी पथक 1 ते 4 ऑक्टोबरदरम्यान गस्त घालत असताना पोलिसांनी संशयावरून सहा जणांची झडती घेतली. त्यांच्याकडून 1.32 कोटीचे ड्रग्ज जप्त करून याप्रकरणी काशीगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींच्या चौकशीतून हाती आलेल्या माहितीच्या आधारे आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान, पोलिसांना ड्रग्ज बनवणारी मूळ कंपनी राजस्थानमधील झुनझुन येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक राजस्थानकडे रवाना झाले. तेथे त्यांनी सातत्याने रेकी केली. यानंतर 14 डिसेंबर रोजी पथकाने झुनझुन, राजस्थान येथील ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून मुख्य आरोपी अनिल सिहाग याला ताब्यात घेतले.
प्रमुख आरोपी कोण?
मुंबई, रायगड, नेरूळमध्ये मोहम्मद अन्सारीवर 6 गुन्हे, उर्वरित महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्याच्यावर 9 गुन्हे, मोहम्मद तनवीर परियानी याच्यावर 4 गुन्हे दाखल असून, यापैकी तीन खुनांचे गुन्हे दाखल आहेत. तो दाऊद टोळीचा सक्रिय सदस्य आहे. मोहसीन शेख याच्यावर 4 गुन्हे, जाहीर गोरे 3 गुन्हे, सोहेल खान 3 गुन्हे, मोहम्मद शाहरूख शेख 1 गुन्हा दाखल आहे. हे या गुन्ह्यातील हे प्रमुख आरोपी आहेत.