ठाणे : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले असून, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी 52 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेट्सवर कारवाई करणे आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम बनवणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेळीच ही नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 52 हजार वाहनमालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, वाढत्या मागणीमुळे आणि नंबर प्लेट बसवण्याच्या संथ प्रक्रियेमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे.
ठाणे परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नंबर प्लेट बसवताना येणार्या अडचणींवर चर्चा करण्यात आली आणि लवकरात लवकर वाहनांना नंबर प्लेट बसवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी एक कार्यप्रणाली जारी केली आहे, ज्या अंतर्गत 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे.
1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांवर आधीच HSRP बसवण्यात आले आहे. जुन्या वाहनांसाठी सुरुवातीस 30 मार्च ही अंतिम मुदत होती, परंतु वाहनांची संख्या लक्षात घेऊन ती 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
52,000 अर्ज दाखल
8,500 वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यात आल्या.
19,500 वाहनांना अपॉइंटमेंट देण्यात आल्या आहेत.
HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार.
परिवहन विभागाकडून वाहन नोंदणी रद्द करण्यासारख्या कठोर उपाययोजना शक्य.
ट्रॅफिक पोलिसांकडून रस्त्यावर थांबवून कारवाई होणार.
वाहनमालकांना HSRP बसवण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर वाहनचालकांना अपॉइंटमेंट मिळते आणि निश्चित तारखेला त्यांच्या वाहनावर HSRP बसवली जाते.
परिवहन विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, अनधिकृत विक्रेत्याकडून नंबर प्लेट बसवू नये. अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही आणि भविष्यात त्या गाड्यांवर कारवाई होऊ शकते.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी व वाहन वितरक यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणार्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना क्र. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही. यामुळे 30 जून 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे