ठाणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेला आज म्हणजेच 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात 197 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1 लाख 21 हजार 244 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्पठ झाले असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी 4 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली 4 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश असून, महिला विशेष पथकाचा समावेश असणार आहे
परिक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणार्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे.