Dombivli Vitthalwadi Heavy Rain
डोंबिवली : विठ्ठलवाडी येथील श्रीराम टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या सरगम गल्ली परिसरात मुसळधार अतिवृष्टीमुळे एका घराचा काही भाग अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.२४) सकाळी घडली आहे. साईकृपा चाळीत राहणाऱ्या अशोक वाघमारे यांचे हे घर असून, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ५ ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. या आपत्तीमुळे वाघमारे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत आणि इतर आवश्यक पुनर्वसन सहाय्य लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जुनी, जीर्ण किंवा कमकुवत बांधकामांची घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केडीएमसी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक व जीर्ण इमारतींसह चाळींचे सर्वेक्षण करून रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे गरजेचे आहे.
तसेच, रहिवाशांनी आपल्या घरांची वेळोवेळी दुरूस्ती करावी, आपत्कालीन यंत्रणेला तात्काळ संपर्क साधावा आणि प्रशासनानेही अशा आपदग्रस्तांना तातडीने पुनर्वसन व आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.