पेशवेकालीन आणि शतकानुशतके जुना असलेला पनवेलमधील ऐतिहासिक वडाळे तलाव सध्या जलपर्णी, जलचर तण ’जायंट साल्विनिया’ मुळे मोठ्या संकटात सापडला आहे Pudhari News Network
ठाणे

Historic Wadale Lake Panvel : तणाच्या तवंगामुळे पनवेलचे वडाळे तलाव आले धोक्यात

महाराष्ट्र सरकारकडे निसर्गप्रेमींकडून ‘वारसा संरक्षण दर्जा’ देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरण (ठाणे): पेशवेकालीन आणि शतकानुशतके जुना असलेला पनवेलमधील ऐतिहासिक वडाळे तलाव सध्या जलपर्णी, जलचर तण ’जायंट साल्विनिया’ मुळे मोठ्या संकटात सापडला आहे. या जलपर्णीमुळे तलावाच्या पर्यावरणीय र्‍हासाला सुरुवात झाली असून, तलावाचे मूळ स्वरूप वाचवण्यासाठी संवर्धनकर्त्यांनी सरकारकडे तातडीने या जलस्रोताला ’वारसा संरक्षण दर्जा’ देण्याची मागणी केली आहे.

तणाच्या मोठ्या तरंगत्या चटयांनी तलावाचा बहुतांश भाग व्यापला आहे. यामुळे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण मर्यादित झाली आहे, परिणामी पाण्याच्या पृष्ठभागाखालील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. एकेकाळी स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जलचर वनस्पतींसाठी नैसर्गिक आश्रयस्थान असलेला हा तलाव आता अनियंत्रित तणाच्या प्रसारामुळे ’कोसळण्याची’ चिन्हे दाखवत आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एकेकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले हे क्षेत्र आता शांत झाले आहे, असे ते म्हणाले. पनवेल येथील पक्षी निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मते, पक्ष्यांच्या विविधतेत झालेला बदल अत्यंत धक्कादायक आहे. एकेकाळी डझनभर प्रजातींचे घर असलेल्या या तलावात आता मोजक्याच 11 प्रजाती आढळत आहेत.

तज्ञांच्या मते, वडाळे तलाव कार्बन साठवणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामुळे हवामान नियंत्रणात मदत होते. मात्र, आक्रमक वनस्पतींच्या वाढीमुळे ही नैसर्गिक प्रक्रिया बाधित होत आहे, पाण्याची गुणवत्ता खालावते आहे आणि कार्बन शोषण कमी होत आहे. खारघरच्या ज्योती नाडकर्णी यांनी गेल्या वर्षी झालेल्या तणांच्या यांत्रिक निर्मूलन प्रक्रियेवर आक्षेप घेतला. या प्रक्रियेत तणासोबतच कमळासारख्या स्थानिक वनस्पतीही उपटून टाकल्या गेल्या, ज्या पाण्याची पारदर्शकता आणि पक्ष्यांसाठी निवारा राखण्यास मदत करत होत्या.

पर्यावरणीय र्‍हासाची गती स्पष्ट

माजी वन अधिकारी अविनाश कुबल आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ डॉ. सुचंद्र दत्ता यांच्यासह निसर्गप्रेमींनी केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, तलावातील पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या 80 हून अधिकवरून केवळ 10 ते 15 पर्यंत खाली आली आहे. यावरून पर्यावरणीय र्‍हासाची गती स्पष्ट होते. साहसी क्रीडा उत्साही सुदीप आठवले यांच्यासह स्थानिक निसर्गप्रेमींनी तलावाच्या पुनर्संचयनासाठी नागरी अधिकार्‍यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. संवर्धन गटांनी तणांचे मॅन्युअल (हाताने) आणि टप्प्याटप्प्याने निर्मूलन, कमळासारख्या स्थानिक वनस्पतींचे पुनरुज्जीवन, तलावात येणार्‍या पोषक तत्वांचा प्रवाह कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औपचारिक ‘वारसा दर्जा’ देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT