योगेश गोडे
सापाड : कल्याण डोंबिवलीत पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघातही झाले. काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. मात्र खड्डे बुजवण्याचा दावा करणारी महापालिका फोल ठरली असून, नवरात्रौत्सवाआधी शहरातील खड्डे बुजवण्याचा इशारा किल्ले दुर्गाडी नवरात्र समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांनी महापालिकेला दिला.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर तारखेपासून 1 ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पूर्व पाहणीसाठी किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांनी पदाधिकार्यांसोबत दुर्गाडी किल्ल्यावर भेट देऊन कामाची पाहणी केली. नवरात्रौत्सवा दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर भक्तांचा अलोट सागर उसळत असल्यामुळे किल्ल्यावर प्रत्येक भाविकाला योग्यरित्या दर्शन मिळाले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करून त्यांना सूचना देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रौत्सवाची मोठी परंपरा आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. कल्याणकरांसह ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवामध्ये लाखो भक्तांची गर्दी होते.
दुर्गाडी किल्ल्यावरील बुरुजाला इजा पोहचू नये यासाठी बुरुजावर काळ्या दगडांचे बांधकाम केले जाणार आहे. नवरात्र उत्सवात बुरुजाला धक्का लागणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे किल्ल्यावरील बुरुज पुन्हा एकदा दिमाखात उभा राहणार आहे. दुर्गाडी किल्ल्यावर शिवरायांनी स्वत: देवीचं मंदिर उभारल्याचं बोललं जातं. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाची सुरुवात केली होती. ही परंपरा आजही कायम आहे. नवरात्र उत्सवाच्या आधी दुर्गाडी किल्ला सज्ज होणार असून लाखों भक्तांसाठी दर्शनासाठी खुला होणार असल्याचे देखील पाटील यांनी यावेळी सांगितले.