हिंदू नववर्षाच्या स्वागताची तयारी बाबत माहिती देताना गणेश मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सेक्रेटरी प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी आदी. Pudhari News Network
ठाणे

Hindu Navavarsha Swagat Yatra : डोंबिवलीत गुढीपाडवा स्वागतयात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल

चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा; वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही येत्या गुढीपाडवा सणानिमित्त भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 30 मार्च रोजी शोभायात्रेची मिरवणूक पश्चिमेकडील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदान येथून सुरू होऊन कोपर उड्डाण पुलावरून शिवमंदिर रोडने चार रस्ता, बाजीप्रभू चौकातून फडके रोडने अप्पा दातार चौकात विसर्जीत होणार आहे.

या शोभायात्रेत लेझीम पथक, सनई-चौघडा, भजन मंडळे, दिंड्या, विविध प्रकारचे चित्ररथ, तसेच विविध समाज मंडळे आणि संप्रदाय सहभागी होणार आहेत. शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग अपेक्षित असल्याने डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागात वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. शोभायात्रेच्या दरम्यान कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने नियोजन केले आहे. तर कुठेही कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहर पोलिसांकडून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

वाहतूक नियंत्रणासह मार्ग बंद करण्याचे आदेश

शोभायात्रेदरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1) (अ) (4) अन्वये वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.

या मार्गांवर प्रवेश बंद

  • फडके रोड : बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.

  • छत्रपती शिवाजी महाराज चौक : डोंबिवली पूर्वेकडून कल्याण रोडने टिळक चौककडे जाणाऱ्या खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद.

  • कोपर उड्डाण पूल : डोंबिवली पश्चिमेकडून कोपर ब्रिजवरून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी.

  • टिळक रोड : केडीएमटी व एनएनएमटी बसेससाठी टिळक रोड येथे प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग असा...

फडके रोडवरील वाहने ठाकुर्ली जोशी हायस्कूलमार्गे नेहरू रोड व टिळक रोडने प्रवास करू शकतील. खासगी बसेस व अवजड वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकात यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जातील. कोपर उड्डाण पुलावरील वाहने महात्मा फुले रोड, बावन चाळ, नवीन ठाकुर्लीमार्गे पूर्वेतील व्ही. पी. रोडने पुढे प्रवास करू शकतील. केडीएमटी व एनएनएमटी बसेस आरपी रोडने चार रस्ता, पाटणकर चौक व मानपाडा रोडने पुढे जातील.

वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

नागरिकांसाठी नेहरू मैदान येथे वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ही वाहतूक अधिसूचना रविवारी 30 मार्च रोजी पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत लागू राहील. मात्र पोलिस, अग्निशमन दल, रूग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT